मुंबई–अजित पवार यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे घोटाळे आहेत. त्यामुळेच सरकार पार्थ पवारांना वाचवणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यात दलाल हे सरकार चालवत आहेत. अजित पवारांनी पुणे जमीन घोटाळा प्रकरणी तत्काळ राजीनामा द्यावा. पण हे बेशरम सरकार आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. ते बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलत होते.
सपकाळ म्हणाले, पुणे, मुंबईच नव्हे तर तालुका पातळीवरसुद्धा जमीन घोटाळ्याचे रॅकेट सक्रिय आहे. पुण्यातील व्यवहारांमागे मोठ्या नेत्यांचा हात आहे. अजित पवारांकडे देवेंद्र फडणवीस यांचे अनेक मोठे घोटाळे आहेत. त्यांनी स्वतः ज्या जमिनी लाटल्या आहेत, त्याचे किस्से अजित पवारांकडे आहेत. झोटिंग कमिटीचे अहवाल दुर्लक्षित केले जातात, पण दोषींना क्लीन चिट दिली जाते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी ईडीकडे जावी आण सर्वोच्च न्यायालयानेही दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही सपकाळांनी तीव्र शब्दांत टीका केली. शंभर वर्षांनंतरसुद्धा संघाने ठरवून घ्यावे की त्यांचे उद्दिष्ट नेमके काय आहे? मोहन भागवत नेहमी संभ्रमात असतात. आज त्यांचा प्रभाव ना भाजपवर राहिलेला आहे, ना महाराष्ट्राच्या राजकारणावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संघाचं ऐकत नाहीत. ७५ वर्षांनंतरच्या रिटायरमेंटचा सल्लाही त्यांनी फेटाळला. फडणवीस यांना अजित पवारांना सोबत घेऊ नका, असे सांगितले, तरी त्यांनी घेतले. त्यामुळे आज संघ आणि मोहन भागवत रबर स्टॅम्पपेक्षाही कमी किंमतीचे ठरले आहेत, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
राज्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना सपकाळ म्हणाले, महाविकास आघाडी युतीबाबत राज्यस्तरावर अजून निर्णय नाही. स्थानिक नेतृत्वाला अधिकार देण्यात आले आहेत. १२ नोव्हेंबरला सर्व निर्णय जाहीर होतील. मनसेसोबत युतीच्या चर्चांबाबत त्यांनी स्पष्ट केले की, अशा कोणत्याही प्रस्तावाची धुसर शक्यताही नाही. प्रस्ताव आला, तर तो राष्ट्रीय पातळीवर चर्चा करूनच ठरवला जाईल. ते म्हणाले, इंडिया आघाडी ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अनेक पक्ष या आघाडीत सहभागी आहेत आणि एकत्रितपणे निर्णय घेत आहेत.

