भाजपला बॅलेट पेपर
का नकोत ?
पुणे : राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (मत पत्रिका) घ्याव्यात, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (रविवारी) निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.
ईव्हीएम मशिन्स नादुरुस्त आहेत, अपुरी आहेत, अशा बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. निवडणूक यंत्रांमधील ही त्रुटी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या वेळी तसेच महापालिका निवडणुकीच्या वेळीही रहाण्याची शक्यता आहे. व्हिव्हिपॅट मशीनबाबतही मतदारांच्या मनात शंका आहेत. मतदान पारदर्शी होण्यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरच वापरावा, असे मोहन जोशी यांनी निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणूक जिंकू, अशा डरकाळ्या आत्तापासूनच फोडत आहेत. सत्तेतील मित्रपक्षांनाही बाजूला ठेवून स्वबळावर निवडणूक लढण्याची खुमखुमी भाजपला आहे. मग ते बॅलेट पेपरवर निवडणुका नकोत, असे का म्हणत आहेत? त्यांना कशाची भीती वाटते? असा सवाल मोहन जोशी यांनी भाजप नेत्यांना केला आहे.
साधारणपणे अडीच वर्षानंतर महापालिका निवडणुका होत आहेत. त्या निःपक्ष आणि पारदर्शी वातावरणात व्हाव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे.
बोगस मतदारांची नावे यादीत घुसवणे, मतदार वगळणे, असे अनेक गैरप्रकार करून भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुका जिंकल्या. ही मतचोरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी उघडकीस आणली. त्यानंतर मतदारांमध्ये जागृती झाली असून, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी मतदारांकडूनही जोरात होत आहे, असेही मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

