– लायन्स क्लबतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आनंद मेळावा
पुणे: जीवनात कधीही निराश होऊ नका, कारण प्रत्येक समस्येला उत्तर असते. त्यासाठी आपल्या आहारात सत्त्व, जगण्यात तत्त्व आणि बोलण्यात ममत्व, या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असा सल्ला प्रसिद्ध वक्ते आणि लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल द्वारका जालान यांनी दिला. जीवनातील कुठल्याही समस्येचा सामना करताना, ‘गिव्ह अप’ न करता सातत्याने पाठपुरावा केल्यास मार्ग सापडतो, यावर विश्वास ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले.
लायन्स क्लबच्या ‘हाक दिव्यांगांची, साथ लायन्स’ची या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांसाठी विशेष आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात द्वारका जालान यांनी ‘चलती रहे जिंदगी’ या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लायन रमेश शहा, लायन दीपक शहा, लायन सीमा दाबके हे मान्यवर व्यासपीठावर होते. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात हा आनंद मेळावा झाला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या पाच संस्थांचा प्रातिनिधिक सत्कार करताना त्यांना उपयुक्त वस्तूंच्या संचाचे वाटप करण्यात आले.
द्वारका जालान यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीतील भाषणाने श्रोत्यांना खिळवून ठेवले. मोबाईलने उपयुक्ततेपलीकडे जात आपले जगणे निष्क्रीय केले आहे, असे सांगून ते म्हणाले, जीवन रोज नव्याने मिळते आणि मृत्यू एकदाच येतो, हे लक्षात ठेवून, रोज जीवनाचा नव्याने आनंद घ्यायला शिकले पाहिजे. जन्म आमि मृत्यू यांच्यामधले जीवन हसत, आनंदाने जगण्याचा पर्याय निवडला पाहिजे. जीवन वाया घालण्यापेक्षा आस्वाद घेणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही परिस्थितीत निराश होऊ नका, पाठपुरावा करत राहा. तक्रारी करण्यापेक्षा स्वीकार करा आणि जीवन आनंदी कसे होईल, इकडे लक्ष द्या. दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षक या मुलांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि गौरवाची भावना व्यक्त केली.
संदीप खर्डेकर म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना कधी कधी कुटुंबीयही नाकारतात, पण त्यांचे शिक्षक मात्र देवदूताप्रमाणे त्यांच्यासाठी काम करतात. एरवी दिव्यांगांचे शिक्षक दुर्लक्षित, उपेक्षित राहतात, पण लायन्स क्लबच्या या उपक्रमाच्या माध्यमातून या सेवाव्रती शिक्षकांना दिलासा देण्याचे कार्य सुरू आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
रमेश शहा म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षक अनेकदा उपेक्षित राहतात. प्रत्यक्षात ते सर्वांत महत्त्वाचे कार्य करतात. विशेष कौशल्याने ते अध्यापन करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळावी, यासाठी हा आनंद मेळावा आयोजित केला आहे.
सीमा दाबके यांनी प्रास्ताविकात आनंद मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. या समारंभात ५० पेक्षा अधिक संस्थांना उपयुक्त वस्तूंचा संच भेट देण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या. नामदेव गरूड यांनी ब्रेल लिपीच्या माध्यमातून मान्यवरांचा परिचय करून दिला. मेघना जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
मेळाव्याच्या उत्तरार्धात म्यूझिकल तंबोला सादर करण्यात आला. सुहास दाबके, पूनम अष्टेकर, प्रीतम गांधी, महेंद्र शर्मा, विजय रोडे, संगीता झंवर, अनघा शहा, प्रवीण खुळे, मिलिंद तलाठी, सुरेश मेहता, शेखर शेठ, अनिल मंद्रुपकर, सुवर्णा सांडभोर, हर्ष नायर आदी उपस्थित होते.

