पुणे: “मूल्यांची जपणूक आणि मूल्यवर्धनास नैतिकता, प्रामाणिकता, तथ्य आणि सत्याची दिली, तर त्यातून चांगल्या संपत्तीची निर्मिती होईल. विविध क्षेत्रांतील विदेशी कंपन्यांसाठी आपले बुद्धीवैभव खर्च होतेच; पण त्यासोबतच या बुद्धीचा वापर आपल्या देशासाठी अधिक प्रमाणात व्हायला हवा,” असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी तरुणाईला दिला. व्यवसाय करताना स्वतःचे छंद जोपासा, ते तुम्हाला ताणतणावांपासून मुक्त ठेवतील, तुमची एकाग्रता वाढेल. जिज्ञासा, सतत शिकण्याची वृत्ती जागी ठेवा, तुमच्यातील विद्यार्थी जागा ठेवा, असे आवाहनही जावडेकर यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज, ‘आयसीएआय’ पुणे शाखा व ‘विकासा’ शाखेच्या वतीने सीए विद्यार्थ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी प्रकाश जावडेकर बोलत होते. महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजिलेल्या या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत देशभरातुन २००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे व सीए संजीवकुमार सिंघल, ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. एस. बी. झावरे, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर व सीए अभिषेक धामणे, ‘आयसीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, परिषदेच्या समन्वयिका व ‘विकासा’ चेअरपर्सन सीए प्रज्ञा बंब, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम, ‘विकासा’चे व्हाइस चेअरमन श्रीयस नवले, सचिव संयोगिता कुलकर्णी, खजिनदार वेदांत वेदुआ, सहसचिव प्रांजल देवकर, सहखजिनदार जय येडेपाटील, संपादक वैभव अंभोरे आदी उपस्थित होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, “तुम्ही नव्या काळाचे प्रतिनिधी आहात. तुमच्यापुढे अनेक संधी, कर्तृत्वाचे आभाळ खुले आहे. सनदी लेखापाल हा व्यवसाय अंगिकारताना विनम्रता, विश्वासार्हता, खरेपणा, नेमकेपणा आणि व्यावसायिक शिस्तीचे पालन करा. कामाचे क्षेत्र कुठलेही असले, तरी आपण भारताचे प्रतिनिधी आहोत, हे लक्षात ठेवा. नीतिमत्तेवर आधारित उत्तम प्रॅक्टिस ही काळाची गरज आहे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सनदी लेखापाल हे देशाचे आर्थिक क्षेत्रातले लढवय्ये आहेत. तुम्ही जगात कुठेही हा व्यवसाय करू शकता. उच्चतम ध्येय गाठण्याचे स्वप्न ठेवून जागतिक स्तरावरचे काम करण्याचा प्रयत्न करा.”
सीए संजीवकुमार सिंघल म्हणाले, “सीए हे देशाचे ग्रोथ इंजीन आहे, हे लक्षात घेऊन नोकरी मिळवण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करा. ग्राहकांचा विश्वास मिळवा. तुमची प्रत्येक नवी कृती हे देशासाठी पुढचे पाऊल ठरावे.”
सीए एस. बी. झावरे म्हणाले, “स्वतःला नेहमी काळासोबत अपडेट ठेवा. व्यावसायिक मूल्यांशी तडजोड करू नका. सीए देशाचे आर्थिक विश्वातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्ट अशा विविध भूमिका निभावू शकतात.”
सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे यांनीही विद्यार्थ्यांचा प्रोत्साहित केले. सीए सचिन मिणियार यांनी भावी सनदी लेखापालांनी आपल्या युवा उर्जेसह नवकल्पनांचे, आत्मविश्वासाचे योगदान या क्षेत्राला द्यावे, मात्र मानवी चेहेरा जपावा, असे आवाहन केले.
सीए प्रज्ञा बंब यांनी राष्ट्रीय परिषदेसाठीच्या ‘अग्रिया’ या संकल्पनेचे स्पष्टीकरण केले. सामाजिक दायित्व, सामूहिक जबाबदारीचे भान असणारे आर्थिक नेतृत्व देशाचे भवितव्य घडवण्यात मोलाचे योगदान देणारे ठरावे, असे त्या म्हणाल्या.
ओम केसकर आणि ओवी टोकेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीयश नवले यांनी आभार मानले.
————–
भारतीय ब्रँड उभारा: जावडेकर
आज जगामध्ये डेलाॅइट, अर्नेस्ट अँड यंग, केपीएमजी आणि पीडब्ल्यूसी हे इंटरनॅशनल ब्रँड मल्टी डिसिप्लिनरी सल्लागार संस्था म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतामध्येही अलीकडे अशा मल्टीडिसिप्लिनरी संस्थेला परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, वित्तीय व कर सल्लागार, कायदे तज्ञ आणि अन्य लोकांनी एकत्र येऊन या क्षेत्रात भारताचा ब्रँड तयार करावा. जवळपास दोन लाख भारतीय सीए व अन्य प्रोफेशनल्स हे या चार संस्थांमध्ये काम करतात. पण त्याचा फायदा परदेशी कंपन्यांच्या मालकांना होतो. आपल्याला आता ओनरशिप घ्यायला हवी. सीए विश्वातील विदेशी मोठ्या कंपन्यांसाठी राबण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारा आणि नव्याने रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न करा, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

