पुणे-पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद देऊन त्याबाबत पाठपुरावा करणाऱ्या पतीनेच तिचा खून करून मृतदेह भट्टीत नष्ट केला नंतर राख आणि अस्थी मुठा नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. वारजे पोलिसांनी कौशल्याने तपास करून या खुनाचा छडा लावत एका गॅरेजचालकाला अटक केली. समीर पंजाबराव जाधव (४२, रा. शिवणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचे पत्नी अंजली (४०) हिचा निर्घृण खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. तपासासाठी त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अनैतिक संबंधांच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली. समीरने पुणे -सातारा रस्त्यावर वारूळवाडी परिसरात पत्र्याची एक शेड भाड्याने घेतली. तेथे त्याने एक लोखंडी बॉक्स नेऊन ठेवला. तसेच, वखारीतून जळणाची लाकडे तेथे नेऊन ठेवली. त्यानंतर, २६ ऑक्टोबर रोजी त्याने अंजलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कारमधून खेड शिवापूर परिसरात नेले. तेथे घाटात फिरल्यानंतर त्याने भेळ विकत घेतली व नवीन शेड दाखवण्याच्या निमित्ताने अंजलीला शेडमध्ये नेले. तेथे उभयतांनी भेळ खाल्ली. ती पूर्ण बेसावध असताना समीरने अचानक गळा दाबून करुन तिचा मृतदेह शेडमध्ये जाळून टाकला. तिची राख व अस्थीही त्याने नदीत सोडल्या. नंतर, त्याने तो बॉक्सही जाळून टाकून पूर्ण पुरावा नष्ट केला. त्याचवेळी त्याने स्वतः:च पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली.आरोपी समीर याचे वारजे परिसरात गॅरेज आहे. तो पत्नी अंजलीसोबत त्याच परिसरात वास्तव्याला होता. त्याने पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद २६ ऑक्टोबर २०२५ ला वारजे पोलिस ठाण्यात नोंदवली. त्याबाबत तो वारंवार पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारीचा पाठपुरावा करत होता. अंजली ज्या दिवसापासून बेपत्ता झाली, तेव्हापासून तिच्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी केले. तसेच, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्याबाबत पोलिसांनी समीर याच्याकडे बारीकसारीक चौकशी केली. त्यामध्ये तो देत असलेल्या माहितीत तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी समीरची कसून चौकशी केली. पोलिसांच्या प्रश्नाच्या सरबत्तीपुढे समीरचा निभाव लागला नाही. त्याने आपणच पद्धतशीर कट रचून अंजलीचा खून केल्याची कबुली दिली.

