कुटुंबाचा सर्वनाश होईल, तसेच मुलगा आणि पतीचा मृत्यू होईल,नरबळी द्यावा लागेल, आणखी 50 लाख रुपये दे अशी भीती घातल्याने फुटले बिंग
पुणे-मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या एका मुलास उपचाराने बरे करतो असे आमिष दाखवून तसेच जादुटोण्याची भिती घालत एका महिलेकडून तब्बल 35 लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या पूनम घनश्याम कोंडे (वय 38), नीलम राहुल जाधव (वय 35, रा. कर्वेनगर), चारुदत्त संजय मारणे (वय 31,रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव), देविका अमित जुन्नरकर (वय 30, रा. उत्सव मंगल कार्यालयामागे, कोथरुड), संतोष मारुती येनपूरे (वय 45, रा. गणेशपुरी सोसायटी, वारजे माळवाडी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जादुटोण्याची भितीमुळे तक्रारदार महिलेस आत्महत्येचा प्रयत्न करण्यास सांगून , कुटुंबाचा सर्वनाश होईल, अशी भिती दाखवून महिलेकडे आणखी 50 लाख रुपयांची मागणी आरोपीकडून करण्यात आल्याने महिलेने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आणि आरोपींचे बिंग फुटले आहे.
याबाबत एका महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला चंदननगर परिसरात राहायला आहे. महिलेचा मुलगा मानसिक विकाराने ग्रस्त आहे. कौटुंबिक अडचणी सोडविणे, तसेच मुलाला मानसिक विकारातून बरे करण्याचे आमिष आराेपींनी दाखविले. त्यासाठी काही विधी करावे लागतील, असे आरोपींनी सांगितले. आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी 35 लाख रुपये वेळोवेळी उकळले.
त्यानंतर आरोपींनी महिलेला एखादा नरबळी द्यावा लागेल, असे सांगून आणखी 50 लाख रुपये देण्याची मागणी केली. नरबळी न दिल्यास कुटुंबाचा सर्वनाश होईल, तसेच मुलगा आणि पतीचा मृत्यू होईल, अशी भिती आरोपींनी घातली. आरोपींनी जादुटोण्याची भिती दाखविल्याने महिला घाबरली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे पुढील तपास करत आहेत.