ससून मध्ये पेट स्कॅन प्रकल्प रखडला वर्षाहून अधिक काळ
पुणे- कर्करोगाचा शरीरात किती व कोठे प्रसार झाला आहे याची तपासणी करण्यासाठी दीड वर्षापूर्वी आलेली ससून रुग्णालयातील ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी’ (पेट स्कॅन) तपासणी मशीन दिरंगाई च्या कारभारातून आता मुक्त होते आहे तर पुणे महापालिकेचा देखील पेट स्कॅन मशिन, रेडिओ डायग्नोस्टिक व प्रयोगशाळा प्रकल्प याच डिसेम्बर महिन्यात सुरु होणार आहे. सुमारे १५ हजार रुपये या तपासणी साठी खाजगी रुग्णालयात खर्च येतो रुबी हॉल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि अन्य काही मोजक्या ठिकाणी पेट स्कॅन मशिन आहेत . ससून मध्ये हि मशीन दीड वर्षापूर्वी आणली गेली मात्र पहिले सहा महिने या रुग्णालयात ती धूळ खात पडली नंतर ती बसविली गेली. रोज खाजगी रुग्णालयात ३० ते ४० रुग्णांच्या तपासण्या होतात तर ससून मध्ये मात्र अवघ्या ४ ते ५ तपासण्या सुरु झाल्या होत्या नंतर त्याही बंद झाल्या आणि आता पुन्हा त्या सुरु होत असल्याचे सांगण्यात येते आहे.
दरम्यान पुणे शहरामध्ये कोणत्याही महापालिकेच्या किंवा सरकारी रूग्णालयामध्ये पेट स्कॅनची सुविधा उपलब्ध नाही आणि यामुळे कर्करोग ग्रस्त गरीब रूग्णांना खाजगी रूग्णांलयांवर अवलंबुन रहावे लागते व खाजगी रूग्णालयाचे दर गरीब व गरजू रूग्णांना परवडणारे नसतात. यावर उपाययोजना म्हणुन पुणे महापालिके मार्फत पीपीपी तत्वावर पेट स्कॅन व रेडियो डायग्नोस्टिक प्रकल्प पुणे मनपा मार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे.
दि.०४/११/२०२५ रोजी महापालिका आयुक्त नवल किशोर राम , आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे,सहा. आरोग्य अधिकारी डॉ. संजीव बावरे, यांनी स्वारगेट हिराबाग आरोग्य कोठी लगत सुरू असलेल्या स्व. वंसतदादा पाटील प्रशिक्षण केंद्राच्या इमारती येथे पेट स्कॅन व रेडियो डायग्नोस्टिक प्रयोगशाळा प्रकल्पाची पाहाणी केली .सध्याच्या काळामध्ये कर्करोगाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठयाप्रमाणावर वाढ होत आहे. कर्करोगाचे निदान करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले पेटस्कॅनची सुविधा कोणत्याही पुणे मनपाच्या रुग्णालयामध्ये उपलब्ध नाही. पुणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असू शकेल ज्यामध्ये पेटस्कॅनची सुविधा उपलब्ध होणार असून गरीब व गरजू रूग्णांना परवडेल अशा सीजीएचएस दरामध्ये उपलब्ध होणार आहे.पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका पेट स्कॅन व रेडियो डायग्नोस्टिक प्रयोगशाळा सुविधा देणारी ठरेल. यामध्ये पॅथॉलॉजी, बायोकेमीस्ट्री लॅब, एमआरआय, सीटी स्कॅन या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे.महापालिका आयुक्त यांनी सदरच्या प्रकल्पाबाचत कामाचा आढावा घेतला व योग्य त्या सुचना दिल्या आहेत आणि हा प्रकल्प माहे डिसेंबर २०२५ अखेर पर्यंत पुर्ण करून सुरु करण्याचे आदेश देखील दिले आहेत .

