पुणे-पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमिनीचा गैरव्यवहारप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा थेट सहभाग आढळून आल्याने टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी सहजिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची सूत्रधार मानली जाणाली शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.शीतलने देश सोडून पलायन केल्याच्या माध्यमातील वृत्ताने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल तेजवानी हिच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले असून, तिचा मोबाईल बंद आहे. तसंच पोलिसांनी ती घरीही आढळून आलेली नाही. शीतल ही पतीसह देश सोडून पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. बावधन पोलीस हे इमिग्रेशन विभागाकडे माहिती मागवून तिच्या परदेश प्रवासाची खात्री करणार आहेत.पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानी हे एक महत्त्वाचे पात्र म्हणून समोर आलं आहे. ही जमीन बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती. शितल तेजवानीने ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवण्यासाठी आणि विक्रीसाठी 272 मूळ मालकांकडून नाममात्र पैसे देऊन कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी मिळवली. त्यानंतर तिने अमेडिया कंपनीला ही जमीन विकली. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के आणि सुनेत्रा पवार यांचे भाचे दिग्विजय पाटील यांची 1 टक्के भागीदारी आहे. वादग्रस्त शीतल तेजवानीचा इतिहास घोटाळ्यांचा राहिला असून, तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे. सागर आणि शितल यांच्यावर 100 कोटी रुपयांहून अधिक कर्ज असल्याचंही समोर आलं आहे.

