पुणे, दि. ७ नोव्हेंबर: आजचा विद्यार्थी हा देशाच्या भविष्यातील पाया असून आदर्श विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. २७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन परिपत्रकानुसार विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसमोर, येरवडा येथे “विद्यार्थी दिवस” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण होते. कार्यक्रमात “शिक्षण हे याघिणीचे दूध” या विषयावर अॅड. बिभीषण गदादे यांचे प्रेरणादायी व्याख्यान घेण्यात आले. यावेळी विशेष अधिकारी माधुरी वाघमोडे, सहाय्यक लेखाधिकारी विलास पाटील तसेच समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. तसेच ‘वंदे मातरम’ गीतास १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम’ गीताचे गायन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती माधुरी वाघमोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विलास पाटील यांनी केले.

