मुंबई-अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणाने मोठं वादळ निर्माण केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या व्यवहारामुळे शासनाची सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आता यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत. अजित पवार म्हणाले, गेल्या 2-3 दिवसांपासून माध्यमांमध्ये जी काही चर्चा सुरू आहे, त्याची माहिती घेऊन मी आपल्याशी बोलेल असे मी सांगितले होते. मी स्पष्टपणे सांगितले होते की माझ्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात मी कधीही नियम सोडून कुठले काम केले नाही. मागे माझ्यावर 2009-10 ला आरोप झाले होते, पण ते सिद्ध झाले नव्हते. तसेच या व्यवहारात सुद्धा मला अजिबात माहीत नव्हते. माहित असते तर मी असे काही होऊ दिले नसते. मी कधीही जवळच्या, नातेवाइकांनी, माझ्या मुलांनी काही जरी व्यवसाय केला असेल तर मी त्यांना सांगत असतो की नियमात असेल ते काम करा. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आता या प्रकरणाची मी संपूर्ण माहिती घेतल्यावर मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधला. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, हा जरी माझ्या घरातला मुद्दा असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावे लागेल, चौकशी करावी लागेल, एसआयटी नेमायची असेल, त्याला माझा पाठिंबा असेल. आरोप करणे सोपे असते, परंतु वस्तुस्थिती जनतेला कळणे महत्त्वाचे आहे.आता या प्रकरणावर सांगायचे झाले तर, या प्रकरणात एक रुपयाही देण्यात आलेला नाही. तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या गोष्टी सांगितल्या आणि विरोधकांनी देखील आम्हाला टार्गेट केले, ते त्यांचे काम आहे. मला आज संध्याकाळी समजले की ते जे काही डॉक्युमेंट तयार करण्यात आले होते, ते सगळे कॅन्सल करण्यात आले आहेत. जो काही व्यवहार झाला होता तो रद्द करण्यात आला आहे. तसेच या राज्याचे अॅडिश्नल चीफ सेक्रेटरी रेविन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त यांची समिती आज जाहीर करण्यात आली आहे. तसेच एक महिन्याच्या आत याबद्दलचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. अजित पवार म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझे कुठल्याही अधिकाऱ्यांना मला सूचना करायची आहे, इथून पुढे असे कोणते प्रकरण आले आणि ते नियमात नसेल तर अजिबात प्रेशरमध्ये न येता कारवाई करायची. अजून सुद्धा या प्रकरणात वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. माझं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे या बद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील ते सर्व बाबींची चौकशी अधिकाऱ्यांनी करावी. माझ्याबद्दल जो काही गैरसमज झालेला असेल त्यांना मी स्पष्ट करतो की या व्यवहारात एक रुपया सुद्धा देण्यात आलेला नाही. या प्रकरणी 2 एफआयआर देखील दाखल झाल्या आहेत. या सगळ्याची चौकशी पारदर्शकपणे करण्यात यावी, अशी मी विनंती करतो. कोणी कोणाची फसवणूक केली, कोणाच्या सांगण्यावरून हे झाले, कोणाचे फोन गेले होते, यात कोणी दबाव आणला होता का? या सगळ्याची चौकशी होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. मला हा व्यवहार झाल्याचे माहीत नव्हते. नियमांच्या बाहेर जाऊन कुठलेही काम करायचे नाही, मला ते अजिबात आवडत नाही. जमिनीच्या व्यवहारात जे काही नोंदणी झाली होती, ती रद्द करण्यात आले आहे. मला एवढे समजले आहे की नोंदणी कार्यालयात जाऊन हे सगळे डॉक्युमेंट्स रद्द करण्याची प्रोसेस झालेली आहे. ही जमीन सरकारी जमीन आहे त्यामुळे या जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. त्यामुळेच या सगळ्याची चौकशी होणार आहे. असे असताना सुद्धा याची नोंदणी कसे काय करण्यात आली? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते की जी लोक ऑफिसमध्ये येऊन सह्या करून गेले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यात पार्थ पवार नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. पार्थ पवार आणि त्याचा पार्टनर दिग्विजय पाटील यांना यासंदर्भात माहिती नव्हती, असे समोर आले आहे. अर्थात याची चौकशी होणार आहे आणि आपल्याला वस्तुस्थिती समजेल, असे अजित पवार म्हणाले.
पार्थचा जमीन व्यवहार अखेरीस रद्द -अजित पवारांचे स्पष्टीकरण
Date:

