पुणे, दि. ७ नोव्हेंबर, २०२५ :- मागील दीड महिन्यात आलेल्या दसरा व दिवाळीमुळे मागे पडलेली महावितरणची वीजबिल वसुलीची मोहीम नोव्हेंबर महिन्यात तीव्र करण्यात आली आहे. पुणे परिमंडलात अकृषी ग्राहकांकडे तब्बल ४३६ कोटी रुपये थकले आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने उपविभागनिहाय पथके तयार केली असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. वीज ग्राहकांनीही त्यांच्याकडील थकबाकी चालू वीजबिलासह भरुन सहकार्य करावे आणि गैरसोय टाळावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण पुणे परिमंडलात महावितरणचे ३८ लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. त्यापैकी ८ लाख ४४ हजार ३८१ ग्राहक थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे ४३६ कोटी ४९ लाख रुपये इतकी रक्कम थकली आहे. उत्सव काळात महावितरणने ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता वसुलीवर जोर दिला होता. मात्र तरीही अनेक ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी थकबाकीत वाढ झाली. ६ नोव्हेंबरच्या आकडेवारी नुसार पुणे ग्रामीण मंडलात २७६९४३ ग्राहकांकडे २६२ कोटी, गणेशखिंड शहर मंडलात २७४३०६ ग्राहकांकडे ९० कोटी ४४ लाख तर रास्तापेठ शहर मंडलातील २९३१३२ ग्राहकांकडे ८४ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत.
वर्गवारीनिहाय घरगुती ७१२६२२ ग्राहकांकडे १६२ कोटी ६१ लाख, वाणिज्यिक १०३९६६ ग्राहकांकडे ६४ कोटी १७ लाख, लघुदाब औद्योगिक १४६८५ ग्राहकांकडे २७ कोटी ४१ लाख, पथदिवे ४८५७ ग्राहकांकडे ९२ कोटी ६५ लाख, पाणीपुरवठा १९४७ ग्राहकांकडे ७८ कोटी ६९ लाख, सार्वजनिक सेवा ४६७३ ग्राहकांकडे ९ कोटी ७५ लाख तर इतर वर्गवारीतील १६३१ ग्राहकांकडे १ कोटी १८ लाख रुपये इतकी थकबाकी आहे.
वीज तोडल्यास पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार
थकबाकीदार ग्राहकांनी वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकी रक्कम विनाविलंब भरुन सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास थकबाकीसह पुनर्रजोडणी आकार भरावा लागतो. सिंगलफेजसाठी ३१० रुपये तर थ्रीफेजसाठी ५२० रुपये पुनर्रजोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक आहे.
वीजबिल भरण्यासाठी….
वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह ऑनलाईनचे अनेक पर्याय दिले आहेत. यामध्ये वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करुन वीजबिल भरता येते. महावितरण मोबाईल ॲप, www.mahadiscom.in संकेतस्थळ, भीम, फोन पे, गुगल पे, पेटीएम आदी युपीआय ॲपचा वापर करुन घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरता येते. वेळेत ऑनलाईन वीजबिल भरल्यास वीजबिलावर सूट देखील मिळते.
ग्राहकांनी वीजबिल भरुन गैरसोय टाळावी
पुणे परिमंडलातील सर्व वीज ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेत भरुन महावितरणला सहकार्य करावे आणि संभाव्य गैरसोय व दंड टाळावा.

