पुणे-“भारतामध्ये कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नवीन राष्ट्रीय कर्करोग अंदाजानुसार देशात दरवर्षी सुमारे 1.41 दशलक्ष नवीन रुग्ण आढळतात आणि त्यामधील 9 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात. स्तनाचा कर्करोग, ओठ व तोंडाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे देशात सर्वाधिक आढळणारे कर्करोगाचे प्रकार आहेत. हे प्रमाण बघता असे स्पष्ट होते की अनेक रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान उशिरा झाल्याने उपचार कठीण आणि आपरिणामकारक ठरतात. असे डॉ. शोना नाग, वरिष्ठ वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट आणि संचालक ऑन्कोलॉजी विभाग, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे यांनी म्हटले आहे.
त्या असेही म्हणाल्या,’ राष्ट्रीय कर्करोग दिनाच्या निमित्ताने, या रोगाविषयी जनजागृती वाढवणे, लक्षणे दिसताच लवकर तपासणी करणे आणि समुदाय पातळीवर वेळेवर उपचार उपलब्ध होण्याची सोय मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. कर्करोग प्रतिबंधाची सुरुवात आपल्या स्वतःच्या दैनंदिन सवयींपासून होते. निरोगी जीवनशैली ठेवणे, तंबाखू आणि अतिमद्यपान टाळणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे या साध्या पण प्रभावी उपायांमुळे कर्करोगाचा धोका नक्कीच कमी होऊ शकतो. आज आपण घेतलेली प्रतिबंधात्मक पावले ही भविष्यासाठी अधिक निरोगी आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठीची सामूहिक गुंतवणूक आहे”

