पुणे-पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांना निलंबित केलेले नाही तर डेअरीची शासकीय जागा खासगी व्यक्तीला दिल्याने निलंबित केले आहे असे येथे कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी निलंबनाच्या आदेशाची कॉपी देखील समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.


हर्षवर्धन सपकाळ यांनी असेही म्हटले आहे कि,’ पुण्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना पार्थ पवार जमीन हडपण्याच्या प्रकरणात नाही तर पुण्याच्या बोपोडी येथील सर्वे नं. ६२ मधील अॅग्रीकल्चर डेअरीची शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तीस दिल्याप्रकरणी निलंबित केले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सरकारची ४० एकर जमीन हडपल्याच्या प्रकरणात तहसीलदार येवले याला अटक केल्याच्या बातम्या पसरवून हे दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. शीतल तेजवानी यांनी शासनाच्या मालकीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या जमिनीची विक्री केलेली आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आणि खरेदी करणा-या अमेडिया कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे. फक्त दुय्यम निबंधकाला निलंबित करून चालणार नाही. जमिनीची विक्री करणारे आणि खरेदीदार या दोघांवरही खोटे दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

