पुणे- आज सकाळीच येणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अखेरीस सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना फोन केला आणि विचारले की नेमका विषय काय आहे, जरा समजून तरी सांगा. त्यावर पार्थ पवार म्हणाले की आत्या मी काहीही चूक केलेली नाही… असे खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमीडीया होल्डिंग्स एलएलपी’ कंपनीने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवार आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यातील जमिनीचे प्रकरण नेमके काय आहे, हे राज्याच्या सरकारने स्पष्ट केले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट करायला पाहिजे. कारण सर्व संभ्रम आहे, या प्रकरणात माझे तीन प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की ही जमीन सरकारी होती का? तर मग ती विकता येते का? जर विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झाला का? दूसरा महत्त्वाचा मुद्दा तहसीलदार म्हणतात की मी त्यावर स्वाक्षरी केली नाही, मग स्वाक्षरी केली नसेल तर व्यवहार कसा झाला? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे यांचे पार्थ पवार यांच्याशी काही बोलणे झाले का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, हो सकाळीच पार्थ पवारांना फोन केला आणि विचारले की नेमका विषय काय आहे, जरा समजून तरी सांगा. त्यावर पार्थ पवार म्हणाले की आत्या मी काहीही चूक केलेली नाही आणि माझ्या वकिलांशी माझे बोलणे झाले आहे. मग जर पार्थ पवार यांचे वकिलांशी बोलणे झाले असेल तर वकील याबाबत स्पष्टीकरण देतील, असे सुळे म्हणाले.
मुख्यमंत्री पार्थ पवार यांना अडचणीत आणत आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला, यावर त्या म्हणाल्या, शक्यता नाकारता येत नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी यात उत्तर दिले पाहिजे. शासनाचे विभाग कोणाला उत्तरदायी असतात? तर मुख्यमंत्र्यांना.पार्थ पवारांचा या प्रकरणात काही संबंधच येत नाही. महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा सांगितलं की, या जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. जर व्यवहारच होऊ शकत नसेल तर मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस कशी काय आली? मुद्रांक शुल्क किती असावे? यावरही एकमत नाही. या प्रकरणात गोलमाल दिसत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

