पुणे, दि. ६ नोव्हेंबर: विद्यार्थी दिवसानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे सहायक आयुक्त (समाजकल्याण) विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे येथे “शिक्षण हेच वाघिणीचे दूध” या विषयावर अॅड. विभीषण गदाचे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाबाबत विद्यार्थ्यांना अधिक माहिती व्हावी याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

