बीड-मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जरांगे पाटलांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत. यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचे समोर आले असून, या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते. या बैठकीदरम्यान हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतरीत्या कोणतेही नाव जाहीर केलेले नाही.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना सर्व माहिती देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. पण आम्ही मागे हटणार नाही. आमच्या जीवावर बेतला तरी आम्ही समाजासाठी लढत राहू. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून, या कटामागे कोण, कशासाठी आणि किती लोक सहभागी आहेत हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या चळवळीचे प्रमुख चेहरे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठं आंदोलन झालं आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. पोलिस तपासातून यामागे कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे का? हा प्रश्न आता पुढे आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जर वेळेवर कारवाई झाली नसती, तर गंभीर घटना घडली असती, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांना अतिरिक्त पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. राज्यातील राजकीय वातावरणात या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी यावर सरकारकडे सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर सरकारने या कटामागील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल, असा विश्वास दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारा ठरत आहे.

