निष्क्रिय पदाधिकाऱ्यांनो पद सोडा ,म्हणाले- आकडे नकोत, काम दाखवा
पुणे- पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत संताप व्यक्त केला. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांकडून अपेक्षित काम होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट इशारा दिला की, काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. इतके दिवस काय केलं ते दाखवा. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाचे काम मनापासून करणाऱ्यांनाच आता संघटनेत स्थान मिळेल. निष्क्रिय कार्यकर्त्यांमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी मांडली.काही कलाकार गेली अनेक वर्षे मनसेत आहेत पण RSS च्या संचलनात जातात तिथले फोटो सोशल मिडिया वर टाकून छाती ठोकून सांगता की मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग मनसेत का आहात?एकाच ठिकाणी रहा.. असे सुनावले. पुण्यातील संकल्प हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ही बैठक प्रत्यक्षात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आणि संघटनात्मक तयारीवर केंद्रित होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तोफ डागली. त्यांनी काही नेत्यांना थेट नाव घेऊन प्रश्न विचारले, मतदार याद्या पूर्ण का नाहीत? शाखांमध्ये बैठक का होत नाहीत? शहरातील लोकांशी संवाद कुठे आहे? त्यांच्या या प्रश्नांना बहुतेक पदाधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे सभागृहात काही काळ पूर्ण शांतता पसरली होती. राज ठाकरे यांनी सांगितले की, मनसेचा कार्यकर्ता जर लोकांमध्ये दिसत नसेल, तर पक्षाचे नाव टिकणार नाही. तुम्हाला जर पक्षासाठी वेळ नाही, तर ते स्पष्ट सांगा आणि पद सोडा, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीत मुळशी पॅटर्न फेम अभिनेता आणि मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनाही राज ठाकरे यांनी फटकारले. काही दिवसांपूर्वी परदेशी यांनी तसेच त्यांच्या काही सहकारी कलाकारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो पाहून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत विचारले, तुम्ही छाती ठोकून सांगत होतात की मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग मनसेत का आहात? एकाच ठिकाणी राहा. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मनसेची ओळख आणि विचारधारा वेगळी आहे, आणि कार्यकर्त्यांनी ती जपली पाहिजे.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या शाखा हे मनसेचे बळ आहे. जर शाखाच निष्क्रिय राहिल्या तर पक्षाची ताकद कमी होते. त्यामुळे प्रत्येक शाखाध्यक्षाने आपल्या भागातील लोकांशी संपर्क ठेऊन स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवावा. त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले, मला आकडे नकोत, काम दाखवा. शाखांमध्ये लोकांची उपस्थिती वाढली पाहिजे, यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. त्यांनी मतदार याद्यांबाबतही नाराजी व्यक्त केली. मतदार यादी पूर्ण का नाहीत? हे तुमचं मूलभूत काम आहे. निवडणूक आली की शेवटच्या क्षणी धावाधाव सुरू होते, हे बंद झालं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीचा मुख्य उद्देश पुण्यातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणे आणि आगामी निवडणुकांसाठी धोरण निश्चित करणे हा होता. परंतु अपेक्षेप्रमाणे चर्चा पुढे न सरकल्याने राज ठाकरे नाराज झाले आणि त्यांनी बैठक अल्पावधीतच संपवली. बैठकीनंतर अनेक शाखाध्यक्ष गप्पच राहिले, तर काहींनी माना खाली घातल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होऊ शकतात. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना दूर करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांच्या या कठोर भूमिकेमुळे आता मनसेच्या संघटनात्मक कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

