शिवतांडव नृत्य, रथयात्रा आणि आतषबाजीने ओंकारेश्वर मंदिर परिसर दुमदुमला

पुणे: त्रिपुरासुराच्या तीन पुत्रांच्या पुतळ्याचा शंकराने एकाच बाणाने केलेला संहार… त्यानंतर झालेली आकर्षक आतषबाजी त्यासोबत सुंदर शिव तांडव नृत्य यांच्या एकत्रित सादरीकरणातून पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पाठीमागील योग हॉल परिसरात त्रिपुरासुराच्या तीन पुत्रांचे पुतळे उभारण्यात आले होते. नटरंग अकादमीच्या कलाकारांनी शंकराचे तांडव नृत्य सादर केले. त्यानंतर सजवलेल्या रथातून भगवान शंकराची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने त्या पुतळ्यांसमोर पोहोचताच शंकराने एकाच बाणाने त्रिपुरासुराचा संहार केला आणि त्यानंतर आकर्षक आतषबाजीने आकाश उजळून निघाले.
कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिर परिसर, मुठा नदीकाठ व मेट्रो पुलावरून गर्दी केली होती. देवस्थानच्या सूचनेनुसार भाविकांनी शिस्त राखत वाहतुकीला अडथळा न होता कार्यक्रमाचा आनंद घेतला.
मंदिराचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर म्हणाले, दिल्लीतील रावण वध कार्यक्रमाप्रमाणे पुण्यातही धार्मिक सादरीकरण व्हावे, या उद्देशाने देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष स्व. गिरीश बापट यांनी हा उपक्रम सुरू केला होता. गेली १२ वर्षे हा उत्सव सातत्याने साजरा होत असून, तो आबालवृद्धांचा आवडता सोहळा बनला आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिर परिसर सायंकाळी भक्ति आणि उत्साहाने उजळून निघाला. भगवान शंकराच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या त्रिपुरासुर वधाच्या देखाव्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

