आदित्य ठाकरे अन् रोहित पवारांची सरकार, EC वर आगपाखड

मुंबई- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत ब्राझीलच्या एका मॉडेलने एक-दोनदा नव्हे तर तब्बल 22 वेळा मतदान केल्याचे सप्रमाण सिद्ध केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकार व निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवत देशात आता निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष राहिल्या नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पुन्हा एकदा मत चोरीचा मुद्दा उपस्थित केला. हरियाणात एग्झिट पोल व पोस्टल बॅलेट काँग्रेसच्या बाजूने होते, पण प्रत्यक्ष निकालात आमचा पराभव झाला. हा पराभव का झाला? याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हरियाणात 5 श्रेणींमध्ये एकूण 25 लाख बनावट मते पडली. म्हणजेच दर 8 पैकी 1 मतदार खोटा होता. निवडणुकीत 5,21,000 पेक्षा जास्त बोगस मतदार आढळले. या माध्यमातून राज्यात 25 लाख मतांची चोरी झाली, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार यांनी सरकार व निवडणूक आयोगावर निशाणा साधला. बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. आज राहुल गांधीनी ब्राझिलियन मॉडेल Matheus Ferrero च्या नावाने दहा वेगवेगळ्या बुथवर 22 वेळेस हरियाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याचे पुराव्यासकट सिद्ध केले. राहुल गांधींचा डेमो बघून माझ्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे डोळे उघडतील, ही अपेक्षा, असे ते म्हणाले.
आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी सरकार व निवडणूक आयोगावर तोंडसूख घेतले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी भाजपला मतचोरीच्या माध्यमातून विविध राज्य ताब्यात घेण्यास मदत करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या हेराफेरीचा पर्दाफाश केला आहे. आज संपूर्ण जग भारताची निवडणूक स्वतंत्र व निष्पक्ष राहिली नसल्याचे पुराव्यांसकट पाहत आहे. कुणी राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीशी सहमत किंवा असहमत असू शकेल, पण ही गोष्ट राजकारण व विचारधारेशी संबंधित नाही. मत चोरीवरील सादरीकरण प्रत्येक भारतीयाने, मग ती कोणत्याही राजकीय विचारसरणीची असो, अवश्य पाहावे असे आहे.
हे सादरीकरण तुमच्या मतांच्या मूल्याविषयी आहे. जे मूल्य आता शून्य झाले आहे. कारण, निवडणूक आयोग एका विशिष्ट राजकीय पक्षाला मतदार यादीत बोगस व बनावट मतदार समाविष्ट करण्याची परवानगी देत आहे. गत काही वर्षांत भारतीय निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठ्या भारतातील जीवंत लोकशाहीला एका ढोंगात रुपांतरित केले आहे. निडवणूक कुणीही जिंको किंवा हारो, पण प्रत्येक भारतीयाला त्याच्या मताचे एकसमान मूल्य मिळण्याचा अधिकार आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच आम्ही वरळी व महाराष्ट्रातील इतर मतदार संघातील मतदारांच्या हेराफेरीचा पर्दाफाश केला. आम्ही त्याविरोधात एक मोठे आंदोलनही केले. पण निवडणूक आयोग त्यावर कोणतीही कारवाई करण्यास नकार देत आहे. राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत फसवणूक, बोगस मतदार जोडून व खऱ्या मतदारांना मतदानाची संधी नाकारून हेराफेरी करण्यात आली हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. ही लढाई भारत व संपूर्ण भारतातील स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुकांसाठी आहे. ही लढाई लोकशाही व आपल्या संविधानासाठी आहे. व्होट चोर, गद्दी छोड, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
232 आमदार जनादेशातून नव्हे मतचोरीतून आले हे स्पष्ट – काँग्रेस
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा दाखला देत महाराष्ट्रात महायुतीचे 232 आमदार जनादेशातून नव्हे तर मतचोरीतून आल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला आहे. आज या देशातील मोदींच्या टोळीने लोकशाहीवर केलेले आक्रमण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी जनतेसमोर आणले आहेत. भाजपा सरकार आणि जनादेश दोन्हींवर कसा दरोडा टाकते हे स्पष्ट झाले. हरयाणा बरोबर महाराष्ट्रातही व्होट चोरी झाली आहे. महाराष्ट्रातही आता 232 आमदार जनादेशातून नव्हे तर चोरीने निवडून आले आहेत हे स्पष्ट आहे. जनतेने या व्होट चोरांना धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले.
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते…; राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
दिल्ली – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. एकच फोटो वापरून १०० विविध नावांनी मतदार नोंदवले जातात. एकाच मतदारसंघात असे हजारो लोक आहेत.जे उत्तर प्रदेशातही मतदान करतात, तेच हरियाणातही मतदान करतात असं सांगत राहुल गांधी यांनी प्रत्येक गोष्टीचे पुरावे मांडले. हरियाणात जवळपास २५ लाख मतांची चोरी केली गेली असा आरोप काँग्रेसने केला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतचोरीबाबत प्रेंझेटेशन केले. त्यात एका घरात ५०० मतदारांची नोंदणी केली जाते. १० पेक्षा जास्त मतदार एकाच घरात असतील तर नियमानुसार तिथे निवडणूक आयोगाचे कर्मचारी जाऊन तपास करतात. परंतु जाणुनबुजून निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करते. एका एका घरात ५०, १०० मतदार आढळतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले होते, मात्र काही मतदारांची नावे विधानसभेत वगळण्यात आली. ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून मतदान केले जाते. ब्लर फोटो वापरले जातात. भाजपाच्या यूपीतील सरपंचाकडून हरियाणातही मतदान केले जाते. हरियाणात काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आला असा आरोप त्यांनी केला.
तसेच निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपा मतांची चोरी करत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणूक आयोगातील लोकांनी मिळून देशातील लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही हीच सिस्टम लागू करण्यात आली आहे. आम्ही देशातील युवकांना पुराव्यासह दाखवू शकतो, निवडणूक आयोगाने काढलेली यादी आहे. त्यात दुबार, बोगस मतदार आहेत. आमच्याकडे व्यवस्था नाही, कारण यंत्रणा त्यांच्या हातात आहे. देशाची लोकशाही उद्ध्वस्त केली आहे. आम्ही आतापर्यंत विविध पुरावे मांडले. ही लोकशाही देशातील जनतेची आहे. त्याचे रक्षण करणे तुमची आणि आपली जबाबदारी आहे असं आवाहन राहुल गांधी यांनी Gen Z युवकांसह देशातील जनतेला केले.
दरम्यान, मतदार यादी भ्रष्ट असेल आणि आम्हाला शेवटच्या क्षणी मतदार यादी दिली जात असेल तर फायदा नाही. मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. आम्ही लोकांना जागरूक करू शकतो, परंतु कायदेशीरपणे ५-५ वेळा नावे यादीत येत असतील. निवडणुकीसाठी मतदार यादीचा वापर होत असेल आणि भ्रष्ट यादीच पुढे येत असेल तर आम्ही काय करू शकत नाही. कुठलाही राजकीय पक्ष काहीच करू शकत नाही. हा सगळा मतदार यादीचा डेटा निवडणूक आयोगाचा आहे. हा आमचा डेटा नाही. आम्ही दाखवलेले प्रेझेंटेशन सुप्रीम कोर्टही पाहतोय. त्यामुळे आम्ही कुणापासून लपून काही करत नाही. हे सगळे देशाच्या जनतेसमोर मांडले जात आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

