जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन : वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आधुनिक उपचार पद्धतींवर चर्चासत्रे
पुणे : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे यांच्या वतीने ३५वे वार्षिक मेगा जीपीकॉन २०२५ हे वैद्यकीय अधिवेशन होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक अनुभव यांची देवाणघेवाण साधण्यासाठी दोन दिवसीय वैद्यकीय परिषद पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशातील आणि राज्यातील नामवंत डॉक्टर विविध विषयांवर आपले सखोल विचार मांडणार आहेत, अशी माहिती आयोजनाध्यक्ष डॉ. सुनील भुजबळ आणि सचिव म्हणून डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आयोजन सचिव डॉ. राजेश दोशी, आयोजन सह-अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब काकडे उपस्थित होते.
वैद्यकीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिनांक ८ नोव्हेंबर रोजी डॉ. उर्मी सेठ (रुबी हॉस्पिटल) ‘हिमॅटोलॉजी’ या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान देतील. यानंतर डॉ. नीरज अडकर ‘जटिल हिप फ्रॅक्चरमध्ये कॉक्सो-फेमोरल बायपास’, डॉ. यशवंत माने ‘आयव्हीएफ – मानवजातीसाठी वरदान’, आणि डॉ. रितेश भल्ला ‘मेंदूतील ट्यूमरचे पॅथोफिजिऑलॉजी” या विषयांवर मार्गदर्शन करतील. उत्कृष्ट शैक्षणिक सत्रे, फार्मा स्टॉल प्रदर्शन, पेपर आणि पोस्टर सादरीकरण, निबंध व वादविवाद स्पर्धा, तसेच सर्वोत्कृष्ट क्लिनिक स्पर्धा ही या अधिवेशनाची मुख्य आकर्षणे असतील.
त्यानंतर डॉ. मनोज श्रीवास्तव ‘आजच्या युगातील लिव्हर ट्रान्सप्लांट’, डॉ. सुनील जावळे ‘डायबेटिक किडनी’, तसेच डॉ. रुशिकेश बडवे ‘दैनंदिन जीवनातील सांधेदुखी’, डॉ. सुनील आंभोरे ‘गुदाशय विकार’, डॉ. निखिल ऋषिकेशी ‘सामान्य डोळ्यांचे आजार’ आणि डॉ. विशाल सेठ ‘स्टिएटोरिक लिव्हर डिसीजचे मेटाबॉलिक विकार’ या विषयांवर बोलणार आहेत. दिवसाच्या अखेरीस प्रश्नोत्तर आणि पॅनेल चर्चा होणार आहे.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता वक्ते अनिकेत शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे.
यानंतर डॉ. नस्ली इचापोरिया ‘स्ट्रोकची प्रारंभिक चेतावणी चिन्हे’, डॉ. समीर सोनार ‘न्यूक्लियर मेडिसिन उपचार – भविष्य इथेच आहे’, डॉ. पियुष लोढा आणि डॉ. सायमन ग्रँट ‘रेडिओलॉजीतील नवे प्रगत तंत्रज्ञान’ या विषयांवर सादरीकरण करणार आहेत. सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या वेळी मुख्य अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल माजी महासंचालक, वैद्यकीय सेवा (भारतीय सेना) (डॉ.) ए. के. दास उपस्थित राहणार आहेत. तसेच रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
दुपारच्या सत्रात डॉ. अनुज दरक ‘तापामध्ये पुनर्उर्जितीकरणाचे महत्त्व’, डॉ. हसमुख गुजर ‘ऑफिस प्रॅक्टिसमध्ये डिस्लिपिडिमियाचे व्यवस्थापन’, डॉ. हिमानी तापस्वी ‘शाळेतील सोयीपासून प्रवेश परीक्षेच्या प्रवासापर्यंत’, डॉ. सुष्रुत सेव्हे ‘बुरशीजन्य संसर्ग आणि त्यावरील उपचार’, तसेच डॉ. संजय राऊत ‘द सोलफुल सोल्यूशन – कार्डिओ-किडनी-मेटाबॉलिक आरोग्यात ओरल सेमाग्लुटाईडची प्रगती’ या विषयांवर बोलणार आहेत.

