वैद्यकीय कौशल्य, प्रशिक्षण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेचा येथे संगम
सुयोग्य प्रशिक्षण, उत्कृष्ट प्रकारची चिकित्सा आणि कर्करोगासारख्या गुंतागुंतीच्या आजारांच्या
उपचारांवर विशेष लक्ष या वैशिष्ट्यांमुळे पुण्यातील रुग्णालयांत जटिल रोबोटिक शस्त्रक्रिया
होतात मोठ्या संख्येने.
रुग्णालयात राहण्याचा कालावधी आता होत आहे निम्मा; उच्च जोखमीच्या रुग्णांचा बरे होण्याचा
वेग जास्त; त्यामुळे प्रगत शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी इतर शहरांतील अधिकाधिक रुग्ण करतात
तुलनेने कमी खर्च येणाऱ्या पुण्याची निवड.
पुणे, 05 नोव्हेंबर २०२५ : दरवर्षी हजारो रोबो-सहाय्यित शस्त्रक्रिया करणाऱ्या आणि गेल्या काही वर्षांत
प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेल्या पन्नासहून अधिक शल्यविशारदांच्या माध्यमातून पुणे आता
भारतातील रोबो-सहाय्यित शस्त्रक्रियेचे (आरएएस) अग्रगण्य केंद्र म्हणून झपाट्याने उदयास आले आहे.
साधारणपणे दिल्ली आणि मुंबईसारखी महानगरे याबाबत चर्चेत असतात, मात्र आता युरोलॉजी,
ऑन्कोलॉजी, स्त्रीरोगशास्त्र, पचनसंस्था आणि बालरोग अशा विविध शाखांमध्ये अत्यंत अचूक आणि
अत्यल्प छेद घेतल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांद्वारे पुणे नवीन मापदंड निर्माण करत आहे. त्याचबरोबर, येथे
दिली जाणारी प्रगत आरोग्यसेवा मोठ्या महानगरांच्या तुलनेत सुमारे वीस टक्के कमी खर्चात उपलब्ध
असल्याने रूग्ण पुण्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत.
‘दा विन्ची’सारखे अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान पुण्यातील रुग्णालये मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहेत.
त्यामुळे प्रगत शस्त्रक्रिया अधिक प्रमाणात होत आहेत. या तंत्रज्ञानाने रुग्णांच्या प्रकृतीत गुंतागुंत कमी
होऊन ते लवकर बरे होतात आणि उपचारांचे दीर्घकालीन परिणामही अधिक चांगले दिसून येतात. पुण्यात
शल्यविशारदांचे कौशल्य, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि रुग्णांना सहज उपलब्ध होणारी सेवा हे तिन्ही घटक एकत्र
येऊन उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळते. ही पुण्याची खासियत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयसह (डीएमएच) पुण्यातील इतर अग्रगण्य रुग्णालयांनी उच्च दर्जाच्या
आरोग्यसेवेवर आणि शल्यविशारद मार्गदर्शनावर भर देणारे सक्षम रोबोटिक कार्यक्रम उभारण्यात
महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“दीनानाथमध्ये आत्तापर्यंत २००पेक्षा अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. येथील
डॉक्टर सध्या दरमहा १२ ते १५ जटिल शस्त्रक्रिया करतात. यामध्ये प्रोस्टेट, मूत्रपिंड आणि मूत्राशयातील
कर्करोग यांवरील शस्त्रक्रिया, त्याचबरोबर आयव्हीसी थ्रॉम्बेक्टॉमी, पेनाइल कर्करोगासाठीचे ग्रॉइन नोड
डिसेक्शन, वृषणाचा कर्करोग आणि रोबोटिक युरीनरी डायव्हर्शन यांसारख्या प्रगत युरोलॉजिकल
शस्त्रक्रियांचा समावेश आहे. मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे घेऊन येणारे तरुण रुग्ण सध्याच्या काळात
अधिक प्रमाणात दिसत आहेत. या संदर्भातील किडनी-सेव्हिंग पार्टिअल नेफरेक्टॉमी शस्त्रक्रियांसाठी
डीएमएच आज एक उत्कृष्ट रेफरल केंद्र म्हणून ओळखले जाते,” असे ‘डीएमएच’मधील युरॉलॉजिकल
ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीचे सल्लागार डॉ. अश्विन ताम्हणकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आमचे उपचार संपूर्णपणे युरो-ऑन्कोलॉजी आणि कर्करोग उपचारांवर केंद्रित असतात.
यातून पुण्यातील वैद्यकीय उपचारांतील तफावत भरून निघत असून आम्हाला सातत्यपूर्ण गुणवत्ता
राखण्यास त्याची मदत होत आहे. आमचा केंद्रित आणि समर्पित दृष्टिकोन हा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या
एकत्रित प्रयत्नांवर आधारित आहे. युरो-ऑन्कोलॉजिस्ट, युरो-रेडिओलॉजिस्ट, युरो-पॅथॉलॉजिस्ट, युरो-
फिजिओथेरपिस्ट आणि विशेष प्रशिक्षण घेतलेले युरो-ऑन्कोलॉजी शल्यविशारद अशी ही आमची टीम
रुग्णांच्या जलद आणि सुरक्षित बरे होण्यावर लक्ष केंद्रित करते. आमच्या एन्हान्स्ड रिकव्हरी प्रोटोकॉल्समुळे
रुग्णांचा आयसीयूतील मुक्काम खूपच कमी राहतो, रक्तस्राव कमी होऊन रुग्णालयात राहण्याचा
कालावधीही घटतो. त्यामुळे अगदी उच्च जोखमीचे रुग्णही अनेकदा शस्त्रक्रियेनंतर थेट वॉर्डमध्ये हलवले
जाऊ शकतात.”
‘डीएमएच’मध्ये आता संरचित प्रशिक्षण हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी
मान्यताप्राप्त प्रॉक्टरिंग सेंटर म्हणून हे रुग्णालय देशभरातील शल्यविशारदांना त्यांच्या प्रारंभिक प्रशिक्षण
काळात मार्गदर्शन आणि पाठबळ देते. त्यामुळे ते आत्मविश्वासाने रोबोटिक तंत्रज्ञान आत्मसात करू
शकतात.
“रोबो-सहाय्यित शस्त्रक्रियेचे भवितव्य हे तंत्रज्ञानातील नवकल्पनांइतकेच शल्यविशारदांच्या व्यापक
प्रशिक्षणावरही अवलंबून आहे. त्या दृष्टीने आम्ही युरोलॉजिकल ऑन्कोलॉजी या विषयात एक विशेष
फेलोशिप योजना विकसित करीत आहोत. त्यात प्रत्यक्ष चिकित्सीय अनुभव, प्रगत सिम्युलेशन आणि
तज्ज्ञांचे मार्गदर्शन असा एकत्रित कार्यक्रम असेल. शल्यविशारदांना या प्रणाली आत्मविश्वासाने आणि
कौशल्याने वापरण्यास सक्षम करणे हीच खरी यशस्वीता ठरणार आहे. त्यायोगे देशभरात सुरक्षित,
सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवता येईल,” असे डॉ. ताम्हणकर यांनी सांगितले.
वैद्यकीय कौशल्याबरोबरच, पुण्यात इतर महानगरांच्या तुलनेत तुलनेत कमी खर्च येतो. साहजिकच रुग्ण
आणि त्यांचे नातेवाईक यांचा पुण्याकडे अधिक ओढा असतो. उच्च दर्जाच्या उपचारांचे चांगले परिणाम
अनुभवल्यामुळे आणि जागरुकता वाढल्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतून आणि आणि अगदी
मुंबईसारख्या महानगरातूनही पुण्याकडे येणाऱ्या रुग्णसंख्येत आणि रेफरल प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ
होत आहे. अवयव जपणाऱ्या उपचारपद्धती आणि शस्त्रक्रियेनंतरच्या जलद पुनर्प्राप्तीस प्राधान्य देणाऱ्या
मिनिमली इनव्हेसिव्ह (अत्यल्प छेदाच्या) तंत्रांचा वापर यांमुळे पुण्याची आज देशात विशेष ओळख निर्माण
झाली आहे.
आरोग्यसेवेच्या अशा वातावरणात, जिथे नवीन, कल्पक उपचारांचा लाभ प्रामुख्याने मोठ्या
महानगरांपुरताच मर्यादित असतो, तिथे पुणे दाखवून देत आहे की लक्षपूर्वक वैद्यकीय नेतृत्व,
प्रशिक्षणासाठीची बांधिलकी आणि तंत्रज्ञानात केलेली गुंतवणूक यांच्यामुळे भारतात प्रगत शस्त्रक्रिया
सेवांचा चेहरामोहरा बदलू शकतो

