पुणे- येथील वाढत्या गुन्हेगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने बुधवारी आंदोलन केले. पक्षाने सरकार विरोधात नारेबाजी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनागोंदी कारभाराचा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रिय नेतृत्वाचा निषेध व्यक्त केला. या वेळी डॉ.सुनील जगताप, किशोर कांबळे, मंजिरी घाडगे, असिफ शेख, अमोल परदेशी,अजिंकय पालकर, विष्णू सरगर, अनिता पवार, रुपाली शेलार, मदन कोठुळे, रोहन गायकवाड, फाहीम शेख, सुमित काशीद, रमीझ सय्यद ,हेमंत बधे, शिवराज मालवडकर, पुजा काटकर आणी शैलेंद्र भेलेकर उपस्थित होते.

पुणे शहरात सध्या कायदा व सुव्यवस्था औषधालाही शिल्लक नाही. भरदिवसा होणारे खून, गोळीबार, कोयत्याचे वार, लूट, टोळी युद्ध हे चित्र पुण्यात सर्वत्र दिसत आहे. पुणेकरांना दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत आहे. आपल्या परिवारातील सदस्य घराबाहेर जाताना ती जिवंत पुन्हा घरी येईल की नाही याची कोणालाही शाश्वती नाही. त्यातच मंगळवारी बाजीराव रोड येथे एका अल्पवयीन मुलाची भर दिवसा निर्घृण हत्या झाली. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिनव कला महाविद्यालय चौक येथे बुधवारी आंदोलन करण्यात आले.याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप म्हणाले, पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील बाजीराव रोडवर भरदिवसा एका मुलाची निर्घृण हत्या झाली. गेल्या काही दिवसातील घटना पाहता, पुणे शहरात कायद्याचे नव्हे, तर गुन्हेगारांचे राज्य आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे, स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र, बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाची जाहिरात करण्यात व्यस्त आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. या अनागोंदी कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व पूर्ण वेळ आपल्या पक्षाच्या प्रचाराला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

