४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडले जाणार
पुणे – महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, गुरुवारी (दि. ६) प्रारूप मतदारयादी जाहीर होणार आहे. मतदारयादीच्या विभाजनात प्रभाग रचनेप्रमाणेच तोडफोड झाल्याचे आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून याद्यांची पुन्हा छाननी करण्यात आली आहे.
या तक्रारीनंतर काही मुकादम आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे लॉगइन बंद करण्यात आले आहे. प्रारूप मतदारयादीवर नागरिकांना हरकती नोंदविण्याची मुदत दिली जाणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदारयादीबाबत झालेल्या आरोपांचे आणि महापालिकेच्या दाव्याचे नेमके सत्य या याद्या जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
महापालिकेची प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आता ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. ही रचना २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येवर आधारित असून, १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार नोंदणी वैध धरली आहे.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसह शिरूर, पुरंदर आणि भोर-वेल्हा या मतदारसंघांतील शहरी भागांचाही समावेश या निवडणुकीत करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी पुणे महापालिकेला यादी सुपूर्त केली होती. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप यादी जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती. मागील वीस दिवसांपासून १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत हे काम सुरू असून, आता स्वतंत्रपणे याद्यांची तपासणी सुरू आहे.
दरम्यान, २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या लाखाच्या आत ठेवण्यात आली होती. मात्र, जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार नोंदणीमुळे सध्याच्या मतदारसंख्या अनेक प्रभागांमध्ये लाखाच्या वर गेली आहे. काही ठिकाणी ही संख्या पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यामुळे इच्छुक उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

