पुणे, दि. ४: भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (कंप्युटर बेस्ड टेस्ट) १३ नोव्हेंबर रोजी सत्र १ (सकाळी ८ वाजता) मध्ये पुणे व अमरावती विभागासाठी व सत्र २ (दुपारी १२ वाजता) मध्ये नाशिक व नागपूर विभागासाठी घेण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी सत्र १ (सकाळी ८ वाजता) मध्ये मुंबई (कोकण) विभागासाठी तर सत्र २ (दुपारी १२ वाजता) मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याने उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका किंवा अन्य ठिकाणी असू शकते. परीक्षा केंद्र बदलण्याबाबत उमेदवाराच्या कोणत्याही विनंतीचा विचार करण्यात येणार नाही. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.
0000

