जनता वसाहतीत २ महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला वचपा; बाजीराव रोडवर भर दिवसा युवकाचा कोयत्याने वार करुन खुन
पुणे- शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्त्यावर आज भर दुपारी गर्दीच्या वेळेत घडलेल्या कोयत्याच्या खुनी हल्ल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणांवर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मयंक खरारे (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुचाकीवरुन जाणार्या दोघा युवकांवर मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने सपासप वार करुन एका १७ वर्षाच्या तरुणाचा भरदिवसा खुन केला.मयंक सोमदत्त खरारे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १८, रा. दांडेकर पुल) यालाही कोयता लागून जखम झाली आहे.मयंक खरारे हा मुळचा मंगळवार पेठेत राहणारा आहे. त्याची आई महापालिकेत कामाला आहे. त्यामुळे त्यांना साने गुरुजीनगर येथे खोली मिळाली आहे. तेथे ते राहतात. दोन महिन्यांपूर्वी जनता वसाहतीतील मुलांबरोबर त्याची भांडणे झाली होती.मयंक खरारे आणि अभिजित इंगळे हे दुचाकीवरुन दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगरकडे जात होते. बाजीराव रोडवरील टेलिफोन भवन जवळ मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यांनी मयंक खरारे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यात तो जागीच कोसळला. त्याचा वाचविण्यासाठी गेलेल्या अभिजित इंगळे यालाही कोयता गालाला लागून जखम झाली. आपली ओळख लपविण्यासाठी हल्लेखोरांनी तोंडाला मास्क लावला होता.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयंक खरारे याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. बाजीराव रोडवरील सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे. खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असून हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

