पुणे : ‘अंगात शंकर महाराज येतात’ अशी बतावणी करून उच्चशिक्षित दाम्पत्याला तब्बल १४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोथरुड परिसरातील या प्रकरणात दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर या दाम्पत्याने दीपक डोळस या आयटी इंजिनिअर आणि त्यांच्या पत्नीची सात वर्षांपासून फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘अंगात शंकर महाराज येतात’ असा दावा करून डोळस दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मुलींच्या आजारपणावर उपायाच्या नावाखाली त्यांनी विविध धार्मिक विधी, पूजापाठ आणि दानधर्मासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यास सुरुवात केली.या कालावधीत त्यांनी डोळस दाम्पत्याला इंग्लंडमधील घर, फार्महाऊस, प्लॉट आणि फ्लॅट विकायला लावले. सर्व संपत्ती विकून आलेले पैसे आरोपींनी स्वतःच्या खात्यात वळवले असल्याचे तपासात उघड झाले आहे.अखेर शेवटचे घर विकण्यास डोळस दाम्पत्याने विरोध दर्शवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी या फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून कोथरुड परिसरात आलिशान बंगला विकत घेतल्याचेही उघड झाले आहे.

