मुंबई-राज्यात मतदार याद्यांमधील कथित घोळावरून मोठे रणकंदन माजले आहे. विरोधकांनी या प्रकरणी मतदारयाद्या स्वच्छ करून निवडणुका घेण्याचा सूर आळवला आहे. त्यात आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भर पडली आहे. त्यांनी राज्यातील काही मतदान केंद्रांवर भाजपला 1 व काँग्रेसला 500 मते पडत असल्याचे नमूद करत संपूर्ण मतदार याद्याच स्क्रॅप करण्याची गरज व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी व मनसेने गत शनिवारी मतदार याद्यांतील कथित घोळाविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता. त्यांनी मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतरच राज्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज व्यक्त केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेची निवडणूकी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेण्याची गरज होती. आमच्या जागा निवडून आल्या असल्या तरी मतदार यादी चुकलेली आहे. मतदार यादीत अनेक ठिकाणी दुबार, तिबार नावे आहेत अशी तक्रार त्यांनी करणे अपेक्षित होते. पण या प्रकरणी पहिला आक्षेप विरोधकांनी नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला. त्यांनी हायकोर्टात पहिली याचिका दाखल केली. त्यानंतर मी, आशिष शेलार व किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यात मतदार यादीत डिलिशन नव्हे तर केवळ ॲडिशन होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कामठी, मालेगाव, सिल्लोड आदी अनेक मतदारसंघांत एकाच व्यक्तीचे नाव चार-चार, पाच-पाच वेळा आले आहे. विरोधकांनी केवळ हिंदू मतदारांच्या नावांवर आक्षेप घेतला. पण अनेक बुथवर मुस्लिम मतदारांचीही एकाहून अनेकवेळा नावे आली आहेत. या भागात भाजपला 1 मत, तर काँग्रेसला 500 मते मिळाली आहेत. ज्या भागात मुस्लिम मतदार वाढले, तेथील मतदारयाद्यांत दुबार, तिबार नावे येत आहेत. तिथे विरोधक आक्षेप घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्वच मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा मतदारयाद्या स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष महत्वाचे घटक आहेत. राजकीय पक्षांशिवाय निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन मतदार यादी निर्दोष करा म्हणतात तेव्हा त्याबाबत पाऊले उचलणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.
आता तर सत्ताधारी ही तेच म्हणत आहेत. मुख्यमंत्री तेच म्हणतात , बावनकुळे मतदार यादी रद्द झाली पाहिजे असे म्हणत आहेत. काल भाजपाचे नेते तेच म्हणाले. मग आता अडचण काय? निवडणूक आयोगाने तात्काळ यांची दखल घेतली पाहिजे. का भाजपाचे खाण्याचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत? मागून कनपट्टीवर काही ठेवले आहे का? असे त्यांनी म्हटले आहे.

