नवी दिल्ली-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच, राजधानी नवी दिल्लीत एक मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (EC) भेटण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने संतप्त नेत्यांनी आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या दिला.
मतदारयाद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह अतुल लोंढे, राजवी झा यांचा समावेश होता.
शिष्टमंडळातील सर्व नेते आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले असता, अधिकाऱ्यांनी सर्वांना भेट देण्यास नकार दिला. केवळ दोन नेत्यांना भेटणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, जोपर्यंत आमच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन आयोगाचे अधिकारी भेट घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून बाहेर पडणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत सर्वांनी एकत्रितपणे ठिय्या आंदोलन सुरू केले. भेट द्यायची असेल, केवळ दोघांना नाही, तर सर्वांनाच भेट द्या, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पुकारलेल्या ठिय्यामुळे दिल्लीत मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये नगरपालिका, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि जानेवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विरोधी पक्षांचा प्रमुख आक्षेप मतदार याद्यांमधील मोठ्या गोंधळावर आहे. लाखो मतदारांची नावे दुबार असणे किंवा याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असणे, यामुळे निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत आणि याच तक्रारीसाठी हे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले होते.
एकीकडे, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी ४ वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे आजच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे आयोगाकडून भेट नाकारली गेल्याने संतप्त झालेल्या मराठी नेत्यांनी थेट आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या मांडल्यामुळे, महाराष्ट्राच्या निवडणुकांवरील राजकीय वाद आता दिल्लीच्या दारात पोहोचला आहे. आयोगाकडून या ठिय्या आंदोलनावर कोणती भूमिका घेतली जाते आणि आयोगाचे अधिकारी अखेर नेत्यांना भेटतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

