पुणे, 03 नोव्हेंबर, 2025: गेल्या अनेक दशकांपासून कला हे मानवी भावना आणि सौंदर्यदृष्टी व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. चित्रकारांनी प्रकाशाचा खेळ, कलात्मक दृष्टीकोन आणि सावल्यांचे चित्रण करुन जगाचे अदृश्य सौंदर्य उलगडले. पुणे येथे मेंदू आणि पाठीच्या कण्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांच्यासाठी कलेची ही संकल्पना थेट मानवी मेंदूपर्यंत विस्तारली गेली. शस्त्रक्रियेदरम्यान, कवटीच्या आत, मेंदूच्या खोलवरच्या रचनेत आणि खाचांमध्ये दिसणारा प्रकाश आणि सावल्यांचा खेळ पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून त्यांनी एक अद्वितीय आणि जबरदस्त चित्रसंग्रह तयार केला. या संग्रहात मेंदूत दडलेली अद्वितीय गुंतागुंत आणि सौंदर्य अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
‘‘मला गेल्या कित्येक वर्षांपासून निसर्ग प्रकाश चित्रकला येते. या काळातच माझ्या रोजच्या शस्त्रक्रियांच्या कामातील प्रकाशाने मी आकर्षित होत गेलो. या निसर्ग प्रकाश चित्रकलेच्या माध्यमातून स्कल बेस ट्युमर (Skull base tumours), मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन (Microvascular decompression), एन्युरिजम्स, इंट्राव्हेंट्रिक्युलर ट्युमर (Aneurysms and intraventricular tumour) यांसारख्या अवघड कामाच्या प्रवासाला अनोखी आणि समृद्ध दिशा मिळाली आहे.’’, असे डॉ. पंचवाघ यांनी सांगितले. त्यांच्या या मनोगतातून कला आणि अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे काम यांतील प्रदीर्घ अनुभव झळकतो.
पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या निसर्गप्रेरित चित्रकलेचा प्रवास सुरू केला. वैयक्तिक आवड म्हणून सुरु झालेला हा प्रवास आता ६० हून अधिक आकर्षक संग्रहात रुपांतरित झाला आहे. नुकतेच मुंबई येथील आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जरी परिषदेत या संग्रहाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. गेल्या सप्टेंबर महिन्यात जर्मनी येथेही डॉ. पंचवाघ यांच्या प्रकाश चित्रकलेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. परदेशातही डॉ. पंचवाघ यांच्या कलाप्रदर्शानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शानातील चित्रांची विक्री करुन ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, हेमीफेशियल स्पाइमने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निधी गोळा करण्यात आला. डॉ. पंचवाघ यांच्या कलेत न्यूरोसर्जिकल कौशल्याची वैज्ञानिक अचूकता आणि कलात्मक प्रवासातील सर्जनशील अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम दिसतो. शस्त्रक्रिया करताना त्यांनी पाहिलेल्या मेंदूच्या गुंतागुंतीच्या रचनेतून प्रेरित होऊन त्यांचे कलाविश्व मानवी मनाच्या सौंदर्यावर आणि जटिलतेवर नवा दृष्टिकोन देते.
डॉ. जयदेव पंचवाघ यांच्या चित्रांना वैद्यकीय आणि कला क्षेत्रातील समुदायांकडून मोठी प्रशंसा मिळाली आहे. डॉ. पंचवाघ यांच्या ‘फायरिंग लाइन्स’s या चित्राला जगभरातून दाद मिळाली. हे चित्र स्पायनल कॉर्ड आर्टिरिओव्हेनस मॅलफॉर्मेशन (Arteriovenous Malformation of the spinal cord) या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या मायक्रोस्कोपिक छायाचित्रावर आधारित आहे. जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि बॅरो न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मायकल लॉटन यांच्या शस्त्रक्रियेचे हे चित्र होते. डॉ. लॉटन हे एलोन मस्कच्या न्यूरालिंकशी जोडलेले असल्याने प्रसिद्धीझोतातील नाव आहे. ‘फायरिंग लाइन्स’ या चित्रात केवळ स्पायनल कॉर्डची जटिलताच नव्हे तर सूक्ष्मदर्शकाखाली दिसणा-या लाल, गुलाबी, किरमिजी आणि पिवळसर रंगांच्या रक्तवाहिन्यांचे नैसर्गिक सौंदर्य कलात्मकरित्या रेखाटले आहे. डॉ. पंचवाघ यांनी सांगितले, ‘‘मी पहिल्यांदाच दुस-या न्यूरोसर्जनची शस्त्रक्रिया चित्रित केली. या चित्रासाठी मला तब्बल १२ तास लागले. मला जगातील अग्रगण्य न्यूरोसर्जनने केलेली प्रक्रिया माझ्या कलेत टिपण्याचा मान मिळाला. हे चित्र मेंदूतील असमान्य रक्तवाहिन्यांचे गुंतागुंतीचे जाळे लाल रंगाच्या छटांमध्ये जिवंत असल्यासारखे प्रभावीपणे दर्शवते.’’
‘‘मेंदूतील महत्त्वपूर्ण रचनांमध्ये लपलेले सौंदर्य आणि गुंतागुंत उघड करणे हा माझ्या कलाकृतीचा उद्देश आहे.’’, या शब्दांत डॉ. पंचवाघ यांनी आपल्या निसर्ग प्रकाश चित्रकलेच्या आवडीमागील कारण स्पष्ट केले. न्यूरोसर्जन म्हणून प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर विज्ञान आणि कला या दोन्ही क्षेत्राचा समन्वय साधण्यात ते आता पारंगत झाले आहेत. आधुनिक एंडोस्कोपीमुळे त्यांना मेंदूच्या गुंतागुंतीच्या रचनेला बारकाईने अभ्यास करता येतो. डॉ. पंचवाघ यांच्या मते, हा वैज्ञानिक आणि कलात्मक शोध आहे. सौंदर्यशास्त्र आणि न्यूरोसायन्सला एकत्र आणणारा हा अद्वितीय कलाप्रकार आहे. त्यांच्या संशोधनाच्या काळात सुरु झालेले साधे रेखाटन हळूहळू चित्रकलेत रुपांतरित झाले. या प्रक्रियेतूनच त्यांना मेंदूचे हे मोहक आंतरिक दृश्य कॅन्व्हासवर उतरवणे शक्य झाले.
डॉ. पंचवाघ यांनी चेह-यामध्ये असह्य वेदना देणा-या या दुर्मिळ आणि वेदनादायी आजाराबाबत जागरुकता पसरवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या दुर्मिळ आजारावर अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेल्या डॉ. पंचवाघ यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रुग्णांना आर्थिक मदत केली. त्यांनी जर्मनीतील कला प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतून ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आणि हेमीफेशियल स्पाइमने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निधी उभारला. डॉ. पंचवाघ न्यूरोसर्जरी आणि सर्जनशीलता यांचा सुरेख संगम साधत आहेत. त्यांच्या या कार्यातून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना तसेच सामान्य जनतेलाही मेंदूतील गुंतागुंतीचे सौंदर्य ओळखण्याची प्रेरणा मिळते. या कलेच्या माध्यमातून त्यांनी गंभीर स्वरुपातील विकारांकडेही लक्ष वेधले आहे.
डॉ. पंचवाघ म्हणाले की, छायाचित्रांपेक्षा चित्रकला माणसाच्या मनाशी अधिक खोलवर जोडली जाते. चित्रकला आणि मानवी अंतरंगाचे अगदी पूर्वापार गुंफेत राहणा-या पूर्वजांच्या काळापासून नाते आहे. कला ही मानवी मनातील जन्माजात सौंदर्य-भूक भागवते. ज्ञान सहजतेने भागवते. या एकमेव कारणामुळे छायाचित्रणाच्या युगातही चित्रकला टिकून आहे.

