पुणे- पेन्शनरांचे शहर,सायकलींचे शहर,शांत शहर,पाण्याची ऐतिहासिक मुबलकता लाभलेले शहर,सांकृतिक राजधानी असलेले,शिक्षणाचे माहेरघर अशा अनेक उपाध्यांनी नटलेल्या शहराला आज महापालिकेची बेसुमार हद्दवाढ आणि निव्वळ उंचच उंच इमारतींना परवानग्या देण्याचा गेल्या २० वर्षात लावलेला अफाट सपाटा यामुळे वाहतूक कोंडी नावाच्या कॅन्सर ने ग्रस्त केले आहे. आणि त्यावर उपाय करणारे म्हणजे निव्वळ खिसे भरणारे डॉक्टर दिसू लागलेत.आणि असे डॉक्टर असले कि शहराचे काय होणार ते सांगणे गरजेचे नाही.या शहरात टांगेवाले होते ज्यांनी रिक्षा आल्या तेव्हा रिक्षांना विरोध केला होता,आता रिक्षा वाले देखील संघर्ष करत आहेत,ओला उबेर आणि बरोबर शासकीय,निमशासकीय संस्थाचे डोक्यावरचे गाठोडे यामुळे रिक्षावाले हैराण न झाले तर नवल.पण हे होताच राहणार बदलत्या काळाप्रमाणे शहराचे रुपडे बदलत राहणार..पण हे बदलताना मुलभूत गोष्टींकडे ध्यान दिले नाही आणि बदलाचा प्रारंभ तिथूनच केला नाही तर अशा शहराचे आजचे कॅन्सरग्रस्त पुणे व्हायला वेळ लागत नाही.
या शहरात वाहतुकीच्या कोंडीच्या नावाने ऐतिहासिक कोतवाल चावडी (जिथे आज गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्पठाना होते, मोठे डेकोरेशन उभारले जाते त्या ठिकाणी हि कोतवाल चावडी होती) पेशव्यांच्या अत्याचाराची कहाणी असे सांगितले जात असलेली हि चावडी वाहतूक कोंडीच्या नावाखाली उधवस्त केली गेली.असंख्य रहिवासी तेथील इमारतीत राहत होते.जेव्हा ती पाडली तेव्हा तेथील रहिवासी कुटुंबे ढसाढसा रडले होते.कोंढवा येथे आंगराज ढाब्याच्या नजीक असलेली सुमारे ५०० सदनिकांच्या रस्ता रुंदीत जाणाऱ्या इमारती राजीव अग्रवाल नामक महापालिका आयुक्तांनी धडाधड पाडून अनधिकृत बांधकामे करणारांना धडकी भरवली होती.शिवाजीराव पवार हे सिटी इंजिनिअर असताना त्यांनी तत्कालीन त्यांचे असिस्टंट माधव हरिहर यांच्या कडून शहरात किती हॉटेल्स असे आहेत ज्यांनी अनधिकृत बांधकामे केलीत त्यांचा सर्वे करून तत्कालीन मंत्री थिटे, मोरे,कलमाडी,तसेच ढोले पा.अशा सर्वच मान्यवरांच्या हॉटेल वर देखील हातोडा मारणे सुरु ठेवले होते.लक्ष्मी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव एकीकडे होता आणि दुसरीकडे लक्ष्मी रस्त्यावरील कापड दुकानांमधील पोटमाळे बेकायदा ठरवून त्यावर धडाधड कारवाया होत होत्या. पण हे फार काळ चालले नाही.निवडणूक आयोगाची शेषन गेल्यावर जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती पुढे २००० पासून हळूहळू सुरु झाली. जुना मुंबई गोवा मार्गातील पुणे वगळले गेले .आणि पुण्यातील वृक्षवल्लीवर कुऱ्हाड आली.कात्रजच्या तळ्यानजीकच्या जंगलात रानगवा पकडण्यात आला होता. ते जंगल नाहीसे झाले.महापालिकेच्या जकात नाक्यांनी हद्दी ओलांडल्या.हळू हळू महापालिकांच्या हद्दी बाहेर बेसुमार भूमाफिया आणि अनधिकृत बांधकामे होऊ लागली, जिल्हाधिकारी कार्यालयाने तर होणाऱ्या बेसुमार टेकड्यांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष केले.पुणे वाढताना ते बकाल बनलेली गावे पोटात घेऊ लागले.आणि तिथून होय तिथून सुरु झाली शहराच्या कॅन्सरची सुरुवात. राजकारण्यांनी इथे महापलिका येणार,येणार असे सांगत आजूबाजूची गावे गिळंकृत करत तिथे जागांचा,बांधकामांचा सपाटा लावत..माया गोळा करण्याचे काम सुरु केले आणि राज्याच्या नगरविकास खात्याने एकामागे एक अशी बकाल गावे महापालिकेच्या पोटात ढकलली.
सहकारनगर तळजाई टेकडीचा भाग म्हणून येथील जयंतराव टिळक नगरलाही महापलिकेत विरोध झाला,पण जास्त उंची न देता अखेरीस राजकीय दबावाखाली ते वसले.शिवाजीराव पवारांचे एक धोरण होते महापालिकेची इमारत 5 मजली.. त्यापेक्षा कोणतीही इमारत मोठी नको,अलका चौकातल्या भारती विद्यापीठाच्या इमारतीला सर्वप्रथम महापलिकेत जोरदार विरोध झाला पण पतंगरावांनी नगरविकास खात्याकडून सहाय्य घेतले. पुढे सिटी इंजिनिअर बदलले.शहरातील वाडे संस्कृतीही आता बदलत होती.आणि ती बदलताना TDR ची संकल्पना आणली गेली.सर्वप्रथम कोथरूड मध्ये TDRघोटाळा झाला(AVB) ..आणि पुढे तो तसाच सुरु राहिला वाड्यांच्या पुनर्विकासाच्या नावाखाली उंच उंच इमारती उभारल्या गेल्या .
रस्ते..रस्त्यांच्या रुंदी याकडे मात्र म्हणावे तसे लक्ष कोणीच दिले नाही BRT च्या प्रभावामुळे स्वारगेट कात्रज रस्त्याचे रुंदीकरण झाले तसे २/३ रस्त्यांची रुंदीकरणे सोडली तर अन्य रस्ते मात्र तसेच राहिले महापालिकेचा बेडूक टम्म फुगत होता.आता शहरातील रस्ते तेवढेच होते त्याच रुंदीचे होते पण उंच उंच इमारती उभारल्या जाऊ लागल्याने जिथे १० कुटुंबे राहत होती तिथे १०० राहू लागली. जिथे ३ कार्यालये होती तिथे ५० कार्यालये निर्माण झाली. ना कोणी व्हिजिटर पार्किंग चा विचार केला.ना इमारतीत असलेल्या सदनिका तेथील रहिवासी त्यांची वाहने आणि पार्किंग कुठे असेल किती असेल याचा विचार केला .कागदोपत्री नाममात्र पार्किग ठेऊन धडाधड बांधकामे झाली.आणि जिथून १० वाहने बाहेर पडत होती तिथून शंभर वाहने बाहेर पडू लागली,त्यातच महालीकेची हद्द सुद्धा अशीच बकाल बनवलेली गावे घेऊन वाढत होती तेथील वाहने देखील रस्त्यावरील वाहनाची संख्या वाढवीत राहिल.आणि मग काय होणार…वाहतूक कोंडीचा अजगर..त्याचा विळखा या पेन्शनरांचे शहर,सायकलींचे शहर,शांत शहर,पाण्याची ऐतिहासिक मुबलकता लाभलेले शहर,सांकृतिक राजधानी असलेले,शिक्षणाचे माहेरघर अशा अनेक उपाध्यांनी नटलेल्या शहराला पडला.
यावर उड्डाणपूल,मेट्रो ,बसेस वाढविणे अशा मलमपट्टी स्वरूपाचे तात्पुरते उपाय होत गेले.अनेकदा पे आणि पार्किंग चे भूत हि लोकांना लुटी साठी उभे केले गेले. हेल्मेट चे भूत उतरविण्यासाठी जे रस्त्यावर उतरले ते खासदार झाले पण हेल्मेटचे भूत मात्र तसेच ठेवले गेले..पुण्याचा हा कॅन्सर बहुधा कोणाला बरा करायचा नव्हताच.तात्पुरत्या औषध उपायांनी पुणे लुटण्याचे काम झाले पण वाहतूक कोंडीच्या अजगराचा विळखा तसाच ठेवला गेला. आणि जातोय याकडे अजूनही कोणी लक्ष द्यायला तयार नाही
१० फुट रुंदीचे, २० फुट रुंदीचे , ४० फुट रुंदीचे रस्ते पुण्यात आहेत.पण एवढ्या रुंदीच्या रस्त्यांवर किती फुट उंचीचे बांधकाम करायला परवानगी द्यायला हवी.याबाबत काही नियम धोरण ठरवायला हवे यावर कोणी विचार करायला तयार नाही.TDR आणि पुनर्विकास या दोनच गोष्टींनी,विशेषतः अनधिकृत बांधकामांनी शहराला कधी गिळंकृत केलेय.यातून आता हे शहर बाहेर पडेल काय? या प्रश्नाचे उत्तर यावरच वाहतूक कोंडी चे उत्तर देखील अवलंबून रहाणार आहे हे तेवढेच निश्चित.

