आधार सोशल ट्रस्टच्या ११ व्या दिवाळी उपक्रमातून सीमावर्ती भागात फराळ, शुभेच्छा संदेशांचे वाटप
पुणे: भारतीय सैन्याला दिवाळीचा रुचकर फराळ, विद्यार्थ्यांनी बनवलेली शुभेच्छा पत्रे, सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय व खेळाचे साहित्य, तसेच सायकली पोहोचल्या. ‘मायेच्या फराळाचा घास’ या उपक्रमातून गेल्या ११ वर्षांपासून आधार सोशल ट्रस्टच्या वतीने सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी सियाचीन बेस कॅम्पवर हा फराळ वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत आगामी काळात या कामामध्ये संस्थेला मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर मुंबईतून हा फराळ सीमावर्ती भागात पाठवण्यात आला. राज्यभरातून १५ ते १७ जिल्ह्यांतील सुमारे १८० ते १९० शाळा या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेच्या माध्यमातून हजारो शुभेच्छा पत्रे तयार केली होती. आजवर १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे संदेश सीमावर्ती भागातील जवानांपर्यंत पोहोचले आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पुणे जिल्हा सरचिटणीस भाजपा गंगाराम जगदाळे, पुरंदर तालुका भाजपा सरचिटणीस विशाल कुदळे यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.
२०१४ पासून या उपक्रमाने पठाणकोट, पुगल (राजस्थान), सिक्कीम-नथुला, जैसलमेर, पंजाब, डलहौसी, जम्मू-श्रीनगर-नागरोटा, सुंदरबनी, अखनूर, चुरणवाला (राजस्थान) आणि कारगिल-रंधावा अशा दुर्गम सीमाक्षेत्रांपर्यंत पोहोचून हजारो जवानांपर्यंत महाराष्ट्राचा स्नेह व कृतज्ञतेचा संदेश पोहोचवला आहे. गेली ११ वर्ष अविरतपणे हा उपक्रम आधार सोशल ट्रस्टचे सर्वेसर्वा संतोष चाकणकर आणि त्यांचे सहकारी यांच्यातर्फे चालू आहे. फराळामध्ये मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रव्याचे लाडू, शंकरपाळी, चकली, चिवडा, अनारसे, लसूण शेव, काजूबर्फी, कापणी, शेव याचा समावेश होता.
आधार सोशल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चाकणकर म्हणाले की, सियाचिनमधील हाडे गोठवणारी थंडी, प्रतिकूल वातावरणात भारतीय जवान देशाची, या मायभूमीची रक्षा करण्यासाठी अहोरात्र तैनात आहेत. बर्फवृष्टीमुळे लँडस्लाइड होतात, ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे शारीरिक, मानसिक हानी होते. अशा या देशप्रेमी, निःस्वार्थी जवानांना मायेचा घास सियाचीन बेस कॅम्पला पोहोचवला. अतिशय आनंदाने त्यांनी हा दिवाळी फराळ आणि मुलांचे शुभेच्छा संदेशाचा स्वीकार केला. सियाचीनसह नुब्रा व्हॅली, लेह येथे वरिष्ठ सेनाधिकारी, सैन्यदलातील जवानांच्या उपस्थितीत हे अभियान पार पडले.
भारतीय सेनेने दाखविलेल्या विश्वासामुळे, या उपक्रमातून सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, क्रीडासाहित्य आणि सायकली देऊन त्यांच्याशी सांस्कृतिक बंध निर्माण करण्याचे काम आधार सोशल ट्रस्ट करत आहे. हा उपक्रम केवळ दिवाळी फराळापुरता मर्यादित नसून, भारतीय संस्कृती आणि सैनिकांच्या त्यागाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणारा एक राष्ट्रीय संदेशवाहक उपक्रम ठरत आहे.
– संतोष चाकणकर, अध्यक्ष, आधार सोशल ट्रस्ट

