भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शहा म्हणाले, “शेवटी भारताने विश्वचषक जिंकलाच! कालची रात्र महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. एखाद्या भारतीय कर्णधाराने प्रथमच आयसीसी महिला विश्वचषक उचलला ही अभिमानास्पद घटना आहे. खेळामधील वाढती गुंतवणूक, पुरुष क्रिकेटपटूंसम समान वेतन धोरण, ‘डब्ल्यूपीएल’मधील स्पर्धात्मक वातावरणातून घडलेली मोठ्या सामन्याची मानसिक तयारी आणि भारतीय संघाचा निर्धार व कौशल्य या सर्वांचा संगम या असामान्य विजयामागे आहे.”
श्री. जय शहा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली क्रिकेट जगतात भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही आमूलाग्र परिवर्तन घडले आहे.
प्रथम ‘बीसीसीआय’चे सचिव आणि आता ‘आयसीसी’चे अध्यक्ष म्हणून, श्री. शहा यांनी सर्वसमावेशकता, आर्थिक समता आणि जागतिक विस्तार यांवर भर देणाऱ्या सुधारवादी धोरणांमधून खेळाच्या प्रशासनाला नवे स्वरूप दिले आहे.
‘आयसीसी’मध्ये जय शहा यांनी परिवर्तनकारी नेतृत्व दिले आहे. सुरुवातीला ते फायनान्स आणि कमर्शियल अफेअर्स कमिटीचे अध्यक्ष होते आणि आता ते ‘आयसीसी’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये आयसीसीने पुरुष आणि महिला स्पर्धांसाठी पारितोषिकांची समान रक्कम जाहीर केली. क्रिकेटमधील लैंगिक समतेकडे जाणारे हे ऐतिहासिक पाऊल आहे.
त्यांनी कोविडनंतर ‘आयसीसी’च्या आर्थिक व व्यापारी आराखड्याला अधिक सक्षम केले, जागतिक महसूल टिकवून ठेवला आणि नवोदित देशांमध्ये क्रिकेटचा प्रसार करणाऱ्या प्रशासकीय सुधारणांना चालना दिली. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे ऐतिहासिक पुनरागमन होणार आहे, या निर्णयातही शहा यांची मध्यवर्ती भूमिका आहे. त्यांनी स्वतः ‘आयसीसी’च्या वतीने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे केलेले सादरीकरण यशस्वी ठरले.
जागतिक क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी जय शहा यांनी बीसीसीआयचे सचिव या पदावरून भारतीय क्रिकेटमध्ये व्यावसायिकता, समता आणि प्रगतीचे नवे युग आरंभले. त्यांनी प्रशासन मजबूत करणारे, कामकाज सुटसुटीत करणारे आणि मंडळ अधिक पारदर्शक व माहिती-आधारित बनवणारे व्यापक सुधार कार्यक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जागतिक क्रीडा क्षेत्रातील एक प्रभावी ब्रॅंड म्हणून उभा राहिला. या लीगने विक्रमी माध्यमाधिकार करार मिळवले. त्यानंतर त्यांनी महिला प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) सुरुवात केली. ही आज जगातील सर्वात मोठी महिलांची क्रीडा लीग बनली आहे.
श्री. शहा यांनी खेळाडूंच्या समान वेतनाचा ऐतिहासिक निर्णय लागू केला. त्यामुळे पुरुष व महिला क्रिकेटपटूंना समान मानधन मिळू लागले. तसेच, देशांतर्गत स्पर्धांमधील बक्षीसांच्या रकमेत आणि मानधनात मोठी वाढ केली. त्यांनी कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘टेस्ट क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू केली आणि बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमीचे (एनसीए) जागतिक दर्जाचे उच्च-कार्यक्षमता व पुनर्वसन केंद्र म्हणून आधुनिकीकरण केले. शहा यांच्या दूरदृष्टीचा परिपाक म्हणून भारताने २०२३ मध्ये विक्रमी यशस्वी आयसीसी विश्वचषकाचे आयोजन केले. त्यातून जय शहा हे भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक प्रभावशाली प्रशासकांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले.
‘बीसीसीआय’च्या सचिव पदावरील कार्यकाळात जय शहा यांनी राबवलेल्या उपक्रमांचे भारतीय क्रिकेटला समृद्ध फळ मिळाले. फक्त तीन वर्षांत भारताने पुरुष आणि महिला गटांमध्ये मिळवलेली पाच आयसीसी विजेतेपदे ही त्याची ठळक उदाहरणे आहेत :
· आयसीसी १९ वर्षांखालील महिला विश्वचषक – २०२३ आणि २०२५
· आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ – १७ वर्षांनंतर मिळवलेले विजेतेपद
· आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ – १२ वर्षांनंतरचा गौरवशाली विजय
· आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ – भारतीय महिलांचा ऐतिहासिक पहिला विश्वविजय!
भारतीय महिलांनी प्रथमच जिंकलेले हे विश्वचषक विजेतेपद शहा यांच्या सर्वसमावेशक आणि सशक्त क्रिकेट व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण ठरले आहे.
दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि धाडसी सुधारणांद्वारे जय शहा हे केवळ आशा निर्माण करत नाहीत, तर ती प्रत्यक्षात उतरवतात. ते असा बदल घडवतात जो सर्वांना एकत्र आणतो आणि प्रत्येकाला स्वप्न पाहण्याची व ती साकार करण्याची समान संधी देतो.

