पुणे : पिंपरी पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईची देशपातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमचे बघुन घेऊ. सीपी, डिसीपी यांना मॅनेज करु, असे म्हणाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला २ कोटी रुपयांची लाच मागून त्यातील पहिला हप्ता म्हणून ४६ लाख ५० हजार रुपये घेताना सापळा कारवाईत पकडण्यात आले.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या जामीन अर्जावर से देण्यासाठी अगोदर चिंतामणी याने २ लाख रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांच्या केबिनमध्ये केली. तसेच तक्रारदार वकील यांना संदिप सावंत व चिंतामणी यांनी त्यांच्या केबिनमध्ये अरेरावीची भाषा केली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
चिंतामणी याने मला एक कोटी व साहेबांना १ कोटी रुपये द्या, अशी मागणी केली. वर साहेबांना हा विषय बोलू नका, असे म्हणाले. त्यानंतर अशिलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी चिंतामणी हे तक्रारदार यांना ‘‘तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमच बघुन घेऊ, सीपी, डिसीपी यांना मॅनेज करु, असे म्हणाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर चिंतामणी याचे तक्रारदार वकीलांच्या अशिलाशी बोलणे झाले. त्यानंतर चिंतामणी हे तक्रारदार ‘‘ त्याला उदया दोन कोटी पोहोचवायला लावा’’असे म्हणाले.
त्यानंतर चिंतामणी याने पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांची भेट घडवून आणली तेव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पंच समवेत होते . तेव्हा पोलीस निरीक्षक सावंत तक्रारदार यांना म्हणाले, फिर्यादीचे पैसे मिळत असतील तर ठिक आहे, किती दिवसात पाठवताय सांगा, असे म्हणाले. त्यावर तक्रारदार यांनी त्यांना तीन चार दिवसात असे म्हणाले, त्यानंतर त्यांच्यात अशिलाच्या जामीन अर्जावरील सुनावणीबाबत चर्चा झाली. त्यावेळी चिंतामणी यांनी सावंत यांना आपण म्हणल्याप्रमाणे मी त्यांना १ सीआरचे बोललो, की एक कराच तुम्ही, असे म्हणाले. त्यावर पोलीस निरीक्षक सावंत तक्रारदार यांना ‘‘म्हटल्याप्रमाणे प्रश्नच नाही, त्यावरती काही विश्वास नाही’’ असे बोलले. तक्रारदार व पंच यांच्याबरोबर बोलताना पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांनी प्रत्यक्ष लाचेची मागणी केली नाही.
त्यानंतर तक्रारदार यांनी चिंतामणी याला अशिलाने ४५ लाख रुपयांची सोय केली आहे. माझ्याकडील दीड लाख रुपये असे ४६ लाख ५० हजार रुपये देतो, असे सांगितले. त्यानंतर दीड लाख रुपयांची रोकड आणि ४५ लाखांच्या बनावट नोटा असे ४६ लाख ५० हजार रुपयांचे बंडल तयार करण्यात आले. चिंतामणी याला रास्ता पेठेतील पुना कॅफेमध्ये वरील मजल्यावर बोलवले. ते तिथे आले व त्यांनी इथे नको, इथे कॅमेरे आहेत, असे म्हणाले. त्यानंतर तक्रारदार व पंच चालत उंटाड्या मारुती मंदिरासमोर पोहचले. तेथे चिंतामणी याने रिक्षा केली. रिक्षाच्या मागील बाजूला लाचेची रक्कम असलेली पिशवी ठेवली. चिंतामणी रिक्षामध्ये बसत असताना त्याने लाचेची रक्कम असलेली पिशवी एका हाताने उचलत असताना सापळा पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत चिंतामणी याने पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांचे नाव घेतले. तसेच पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांच्या केबिनमध्ये चर्चा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एखादा पीएसआय इतकी मोठी लाच कशी मागू शकतो, असा प्रश्न उपस्थित करुन सीबीआयने या कारवाईची दखल घेतली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दल रडारवर आले आहे.

