शिरूर – पिंपरखेड येथे रविवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने रोहन विलास बोंबे (वय 13) या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेमुळे पिंपरखेड परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
दुपारी पावणे चार वाजता रोहन बोंबे घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत असताना, हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. मुलगा दिसत नसल्याचे लक्षात येताच रोहनच्या आजीने आई-वडिलांना सांगितले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. परिसरातील तरुणांनी आरडाओरड करत उसाच्या शेतात शोध घेतला असता, रोहन मृतावस्थेत आढळून आला.
या अतिशय दुःखद घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. परिसरात 20 दिवसांत बिबट्यांच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असूनही वनविभागाने कोणताही ठोस बंदोबस्त केला नसल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. संतापलेल्या जमावाने वनविभागाच्या गाडीला उलटून नंतर पेटवून दिले. ग्रामस्थांनी दोन वेळा रास्तारोको आंदोलन करूनही प्रशासन जागे होत नसल्याने त्यांनी हा संतप्त पवित्रा घेतला. या घटनेनंतर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मुलाचे शवविच्छेदन न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

