शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजन
पुणे : विठुमाऊलीच्या भक्तांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्त संत रचनांच्या सादरीकरणातून उत्कट भावनिर्मिती घडली. निमित्त होते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. 1) बालगंधर्व रंगमंदिरात केले होते. महाराष्ट्राला संतांची महनीय परंपरा लाभली आहे. या संतांनी सर्वसामान्य जनतेला विठुरायाच्या चरणी लीन करत दु:ख, ताणतणाव विसरायला लावण्यासाठी अनेक भक्तिरचनांची निर्मिती केली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जग्तगुरू तुकाराम महाराज यांच्यासह संत तुकडोजी महाराज, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ यांच्या भावभक्तीपूर्ण रचना तसेच काही भक्तीगीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली. सायली तळवलकर, सचिन इंगळे, सुरंजन खंडाळकर आणि शुभम खंडाळकर यांनी भावोत्कट स्वरातून रचना सादर केल्या. कलाकारांना सोहम गोराणे (तबला), प्रतिक गुजर (पखवाज), धनंजय साळुंके (तालवाद्य), तुषार दीक्षित (की-बोर्ड) यांनी समर्पक साथसंगत केली. रवींद्र खरे यांचे अभ्यासपूर्ण निवेदन होते. तर नमोल खाबिया यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ या अभंगाने करण्यात आली. पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘वाचे विठ्ठल गाईन’, ‘वैष्णवा संगती सुख वाटे’, ‘असा कसा देवाचा’ या रचनांसह ‘पंढरपुरीचा निळा’, ‘अमृताहुनी गोड’, ‘देव देव्हाऱ्यात नाही’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘कंकड चुन चुन’, ‘बाजे रे मुरलिया’, ‘बोलावा विठ्ठल’ आदी भक्तीरचना प्रभावीपणे सादर करण्यात आल्या.

