मएसो सीनियर कॉलेज, पुणे यांच्या वतीने भारतीय सेनेच्या सहकार्याने भारत–चीन युद्ध १९६२ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
पुणे: चीनच्या लिबरेशन आर्मी ऑफ चायना या सैन्याने १९६२ मध्ये अचानकपणे अरुणाचल प्रदेश मध्ये केलेला हल्ला हा भारतासाठी एक धक्का होता तरीही या हल्ल्याचा अतिशय प्रखरपणे सामना करत चीन सैन्याला जशास तसे उत्तर देऊन भारतीय सैन्याने आपली कामगिरी बजावली. या युद्धामध्ये वॉलोंग येथे झालेली लढाई ही एक प्रकारे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणायला हवी, अशी भावना भारतीय सैनिकांनी व्यक्त केली.
मएसो सीनियर कॉलेज, पुणे यांच्या वतीने भारतीय सेनेच्या सहकार्याने “वॉलोंगच्या रणांगणातील शौर्यकथा – भारत–चीन युद्ध १९६२” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नल सूरज चांबियाल (एस.एम., टीम लीडर), मेजर यशवीर, लेफ्टनंट समीप यांनी या युद्धाची अतिशय रंजकपणे माहिती दिली. या कार्यक्रमात भारतीय सेनेतील अधिकारी युद्धकाळातील सत्य घटनांचा आढावा घेण्यात आला.
निवृत्त कर्नल सुरज चांबियाल म्हणाले, भारत चीन आणि तत्कालीन ब्रिटिश सरकारमध्ये १९१३ रोजी शिमला येथे शांतता करार झाला होता, परंतु चीन सैन्याने १९६२ मध्ये या कराराचे उल्लंघन करून १८ ऑक्टोबर १९६२ च्या मध्यरात्री अरुणाचल प्रदेश मधील मॅकमोहन या दोन देशांच्या सीमारेषेचे उल्लंघन करून भारतामध्ये घुसखोरी केली. हा हल्ला भारतासाठी अतिशय अनपेक्षित होता परंतु भारतीय सैन्याने आपल्या जीवाची बाजी लावत चीन सैन्याचा अतिशय प्रखरपणे प्रतिकार केला. अरुणाचल प्रदेश मधील अतिशय डोंगराळ आणि खडतर अशा भागामध्ये भारतीय सैन्याने हा भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. भारतीय सैन्य तुलनेने कमी होते तरीही जिगरबाज सैनिकांनी आपल्या जीवावर खेळून चीन सैन्याचा अनेक ठिकाणी पराभव केला. केवळ तीन हजार भारतीय सैनिकांनी हा पराक्रम गाजविला अशी ही माहिती त्यांनी दिली.
सत्रादरम्यान भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सैनिकी जीवनातील शिस्त, देशसेवा आणि त्यागाची महती स्पष्ट केली. त्यांनी तरुणांना आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत युद्धातील तांत्रिक तयारी, मानसिक शक्ती आणि देशभक्तीचे महत्त्व जाणून घेतले. या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवेबद्दल अभिमान, कर्तव्यबुद्धी आणि प्रेरणादायी उत्साह निर्माण झाला. या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे भारतीय सेनेने प्रत्यक्ष युद्धभूमीवरील दृश्ये, सैनिकांचे अनुभव आणि युद्धातील वीरांचा गौरव दृश्ये सादर करण्यात आले. या दृश्यांनी सभागृहातील वातावरण भारावून गेले.
प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य म्हणाले, भारतीय सैन्याच्या अशा अनेक महत्त्वपूर्ण युद्धांच्याबाबत सध्याच्या तरुण पिढीला माहिती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मएसो सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ पुनम रावत सर्व विभाग प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्ग यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेखा वैद्य यांनी केले. उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना भारतीय सैन्याच्या शौर्याची माहिती होईल तसेच त्यांना प्रोत्साहन मिळू शकेल.

