पुणे – सशुल्क पार्किंग स्वागतार्ह पण … बांधकाम परवाने देताना मंजूर असलेल्या फ्रंट, साईड मर्जीन अन पार्किंगच्या हरवलेल्या जागा अगोदर शोधा आणि तिथेच संबधित इमारतींमधील रहिवाश्यांचे अगर व्यावसायिकांचे, व्हिजिटर चे पार्किंग होईल अशी व्यवस्था आपण करा नंतर प्रमुख रस्त्यांवर जरूर सशुल्क पार्किंग चा पर्योग करून पहा असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केले आहे.
त्यांनी या संदर्भात आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’ जंगलीमहाराज रस्ता, बालेवाडीतील हायस्ट्रीट, लक्ष्मी रस्ता,ना. गोपाळकृष्ण गोखले रस्ता ( फर्ग्यूसन महाविद्यालय रस्ता ), बिबवेवाडी तील मुख्य रस्ता अश्या रस्त्यांवर पुढील महिन्यापासून पुणे मनपा सशुल्क पार्किंग सुरु करणार असल्याचे वृत्त वाचनात आले. यामुळे निश्चितच वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळेल आणि ह्या रस्त्यांवरील अव्यवस्थित व डबल पार्किंग करणारे तसेच जागा अडवीणाऱ्यांना देखील चाप बसेल.हा निर्णय स्वागतार्ह असला तरीही यानिमित्ताने एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे ह्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने का लावली जातात ?
याचे साधे उत्तर आहे की येथील बहुतांश इमारतीतील पार्किंग साठी च्या राखीव जागांमध्ये अनधिकृत बांधकाम करून किंवा जागेचा गैरवापर करून त्याठिकाणी व्यवसाय केला जातो व तेथे येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर वाहने लावण्याशिवाय पर्याय रहात नाही.
हीच परिस्थिती ह्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल्स ची आहे, आपण स्वतः पाहणी करून ह्या रस्त्यावरील हॉटेल्स च्या पार्किंग साठी आरक्षित जागांचा तपशील जाहीर करावा व मान्य नकाशा प्रमाणे तेवढ्या वाहनांची जागा उपलब्ध आहे का याची माहिती पुणेकरांना द्यावी.अनेक व्यवसायिक इमारतीं मधील पार्किंग स्पेस गायब असल्याचे ही निदर्शनास आले असून काही ठिकाणी ग्राहकांच्या वाहनांना प्रवेश दिला जात नाही.
तरी आपणास या पत्राद्वारे आग्रही मागणी करत आहे की या प्रमुख पाच रस्त्यावरील गायब झालेल्या पार्किंग स्पेस चा त्वरित शोध घ्यावा व ह्या जागा अगोदर नागरिकांना वाहने लावण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात.
मनपा च्या त्या त्या भागातील बांधकाम निरीक्षक किंवा अतिक्रमण निरीक्षकाकडे याची माहिती उपलब्ध आहेच.
मनपा च्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आणि व्यवसायिकांच्या स्नेहबंधाचा भुर्दंड सामान्य पुणेकरांच्या माथी मारताना वरील बाबींचा विचार करावा अशी मागणी करत आहे. असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

