पुणे- काल गणेश काळे हत्येच्या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली.. हत्येच्या ठिकाणाजवळ आरोपींनी गाडी सोडून पळ काढला होता पण प्राथमिक माहितीनुसार, हत्येचे कारण गँगवॉरमध्येच दडले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आरोपी एकाच गाडीवर बोपदेव घाटाकडे पळाले होते.माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनातील आरोपी मोक्का खाली तुरुंगात असल्याने हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या नातेवाईकांना टारगेट केले असावे असे वाटावे अशी स्थिती सध्या आहे पुणे पोलिसांनी बंडु आंदेकर टोळीतील प्रमुख १५ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्का कारवाई करुन त्यांना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. तरीही काल वनराज च्या हत्येतील १ आरोपी जेल मध्ये असताना त्याचा मोठा भाऊ आणि सोमनाथ गायकवाड टोळीचा सदस्य गणेश काळे याचा खुन करण्यात आल्याने आंदेकर टोळी अजूनही शहर आणि परिसरात दबदबा धरून आहे कि काय ? या टोळीचे धागेदोरे किती लांबवर पोहोचले असावेत यावर आता चर्चा सुरु होऊ शकेल असे दिसते आहे. पुणे गुन्हे शाखेने चार संशयितांना ताब्यात घेतले असून, पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे. तपास युद्धपातळीवर सुरू असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. चारही आरोपी आंदेकर टोळीशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील दोघे अल्पवयीन आहेत.अटक करण्यात आलेले आरोपी खेड शिवापूर मधून ताब्यात घेण्यात आले. साताऱ्याच्या दिशेने पळून जात असताना खेड-शिवापूर परिसरात त्यांना गजाआड करण्यात आले. अटक आरोपींची नावे अमन शेख आणि अरबाज पटेल अशी आहेत.
या प्रकरणाच्या तपासात समोर आले कि,ज्याचा खून झाला त्या गणेश काळे याला कोंढवा पोलिसांनी त्याच्या हत्येच्या केवळ 4 दिवस आधी, म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता बेकायदेशीर देशी दारू विक्रीच्या आरोपाखाली अटक केली होती. पोलीस अंमलदार प्रशांत लक्ष्मण खाडे यांनी दारू विक्रीप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिस तपासात गणेश किसन काळे (वय 30, रा. येवलेवाडी) हा टँगो कंपनीच्या 61 देशी दारूच्या बाटल्या (एकूण ₹2,440 किमतीच्या) विकतांना दिसून आला होता. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ₹8,140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.दारू विक्रीप्रकरणी प्रशांत खाडे, राजपूत, पटेल आणि शेख हे पोलीस 28 ऑक्टोंबर रोजी दुपारी खडी मशीन भागात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार राजपूत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येवलेवाडी येथील शिवकृपा बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे विकत आहे. त्यानंतर पोलिसांनी गणेशला रंगेहाथ पकडले होते. दारू विक्रीच्या या प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर त्याची हत्या झाली आहे.पुण्यातले गँगवॉर या हत्येने संपले नसल्याचे दाखवून दिले आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनासाठी वापरलेली पिस्तुले गणेश काळेचा भाऊ समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणली होती. सध्या समीर काळे हा तुरुंगात आहे.गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात सहभागी होता. त्यानेच हत्येसाठी पिस्तुले मध्य प्रदेशामधून आणली तेव्हा समीरसोबत आकाश म्हस्के, संगम वाघमारे आणि आबा खोंड होते. या चौघांनी धुळेमार्गे मध्यप्रदेशातून पिस्तूले आणल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी नाना पेठेत वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा खून झाला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीला अटक केली होती. याच घटनेचा बदला घेण्यासाठीच गणेश काळेची हत्या झाल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.पोलिसांनी वेगाने तपास करत काळे खून प्रकरणातील चार संशयितांना अटक केली आहे. हे चारही आरोपी आयुष कोमकर खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकरचा नातू स्वराज वाडेकर याचे अत्यंत जवळचे मित्र असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वराज वाडेकर याच्या रूपाने आंदेकर कुटुंबाची तिसरी पिढी सुद्धा गुन्हेगार विश्वात आली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच स्वराज वाडेकरचे मित्र असणारे आरोपी अमन शेख, अरबाज पटेल आणि दोन अल्पवयीन मुलांना खेड-शिवापूर परिसरातून पकडण्यात आले.

