पुणे – रविवारी (२ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ भरधाव वेगातील एका कारला झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये ऋतिक भंडारी आणि यश भंडारी या सख्ख्या चुलत भावांचा समावेश आहे, तर त्यांच्यासोबत असलेला कुशवंत टेकवणी हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही थरारक घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. एम एच 24 डी टी 8292 क्रमांकाची ही काळ्या रंगाची कार अतिवेगात होती. गाडीत बसलेल्यांपैकी कोणीतरी अचानक हँड ब्रेक ओढल्याने कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही कार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली आणि थेट बंडगार्डन मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या खांबावर आदळली. धडक एवढी जबरदस्त होती की, कारचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. फुटेजमध्ये कारचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. या अपघातात पुढच्या सीटवर बसलेल्या ऋतिक आणि यश यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या फुटेजमधून कारचा वेग किती होता, याचा अंदाज येतो. भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून कारचा वेग आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, थोड्याच वेळात फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होणार आहे. अपघातग्रस्त कार भाड्याने घेतली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. गाडी नेमकी कुठून आली आणि अपघाताची नेमकी कारणे काय होती याचा तपास सुरू आहे. अपघातात गाडीत अल्कोहोल किंवा अन्य अंमली पदार्थ होते का, याचीही तपासणी फॉरेन्सिक टीम करणार आहे.

