मुंबई–मुंबईच्या रस्त्यावर निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी संयुक्तपणे काढलेला ‘सत्याचा मोर्चा’ आता आयोजकांच्या अडचणी वाढवणारा ठरला आहे. पोलिसांनी या मोर्चाला औपचारिक परवानगी नाकारली असतानाही, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून आणि बेकायदेशीरपणे सभा घेतल्याबद्दल मुंबई पोलिसांनी या मोर्चाच्या आयोजकांवर कठोर कारवाई केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात शनिवारी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चाला सत्याचा मोर्चा असे नाव देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. यापूर्वी झालेल्या मराठा आंदोलनावेळी सर्वसामान्यांना झालेल्या त्रासामुळे आणि उच्च न्यायालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे पोलीस परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलल्या जात होते. परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढल्यास कायदेशील कारवाई केली जाईल, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतरही महाविकास आघाडी आणि मनसेने संयुक्तरीत्या मोर्चा काढल्याने पोलिसांनी आता आयोजकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी आयोजकांवर बेकायदेशीर सभा आयोजित करणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सत्याचा मोर्चात विरोधी पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट दुबार मतदारांचे पुरावे सादर करत, “निवडणुका एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात याव्या आणि या दरम्यान मतदार याद्यांमध्ये संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी,” अशी मागणी केली. या मोर्चात काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांचेही मोठे नेते सहभागी झाले होते.

