पुणे : आपल्या देशाला जमिनीचा तुकडा असे न मानता ती आपली मातृभूमी आहे असे समजून तिच्या रक्षणाचे परमकर्तव्य प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. तिच्यासाठी प्रेम, आदर आणि भावनात्मकता असली पाहिजे. आज सैन्यदलाला फक्त योद्ध्यांची गरज नसून विद्वान योद्ध्यांची आवश्यकता आहे, कारण तंत्रज्ञानाचे क्षेत्र रुंदावल्यामुळे आजच्या काळात होणारी युद्धे ही अनेकविध पातळ्यांवर लढावी लागत आहेत, असे प्रतिपादन ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर (निवृत्त) यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने आपटे रोडवरील सेंट्रल पार्क येथे 23व्या पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. यात आज (दि. 1) अभिजित खेडकर यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेखक,, कवी स्वप्नील पोरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांनी संवाद साधला.
मातृभूमीविषयी आदर नसणाऱ्या नागरिकांच्या विचारांना कधीच प्रोत्साहन देऊ नका, असे सांगून अभिजित खेडकर म्हणाले, आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर विचार, बोलणे आणि कर्म याला प्रथम प्राधान्य द्या, उत्तम नियोजन करा तरच यश नक्की मिळेल. सैन्यदलात प्रवेश घ्यायचा असेल तर जीवाची जोखीम घेण्याची मानसिकता असणे आवश्यक आहे. मी तिसरीत असल्यापासून पायलट व्हायचे स्वप्न पाहिले. या ध्येयाने प्रेरित होऊन ध्यासपूर्णतेने अतिशय अवघड शारीरिक, मानसिक, बौद्धिक परिक्षा पार करत माझे स्वप्न पूर्ण केले.
ते पुढे म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात युद्धनिती पूर्णत: बदलली आहे. आजचे युद्ध हे संघर्षमय असून विविध पातळ्यांवर लढले जात आहे. त्याकरिता सुयोग्य शिक्षण घेणे आवश्यक आहे.
कुपवाडा सेक्टर येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा अनुभव सांगताना अभिजित खेडकर म्हणाले, त्या वेळी झालेल्या हल्ल्यात जवळपास 18 मृतदेह फक्त दोघांनी उचलून हेलिकॉप्टरमधून तत्परतेने सैनिकी रुग्णालयात रवाना करणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. जीवंत माणूस उचलून नेणे सोपे; परंतु मृतदेह उचलून नेताना मी व बेस कॅम्पवरील पंडित या दोघांचीही मोठी परीक्षा झाली. या वेळी सैनिकाचे मन किती पक्के, घट्ट असावे लागते, बळाची निर्मिती किती प्रमाणात करावी लागते, निर्णय क्षमता किती तत्परतेने वापरावी लागते यांचा पुरेपूर कस लागला.
प्रत्येक सैनिकाच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबियांचा मोठा वाटा असतो, असे सांगून पुढच्या पिढीला संदेश काय द्याल या प्रश्नाला उत्तर देताना खेडकर म्हणाले, आजच्या शिक्षणपद्धतीत प्रामुख्याने नितीशास्त्र आणि सामुदायिक जीवनशास्त्र शिकविले जाणे आवश्यक असून पदवी पर्यंतच्या शिक्षणात या विषयी प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने फक्त वैयक्तिक गरजांचा विचार न करता समाजाचा, मातृभूमीचा, तिच्या सुरक्षिततेचा एक योद्धा म्हणून विचार करत समाजात वावरावे. काहीही झाले तरी देश प्रथम हे तत्त्व स्वीकारल्यास देश सुरक्षित राहिल.
प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले तर स्वागत पी. एन. आर. राजन यांनी केले.

