त्याला अवैध कृत्य करण्याची गरजच नव्हती
मुंबई-आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेला महाराष्ट्र केसरी ,कोल्हापूरचा प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्र आणि कुस्तीप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पंजाब पोलिसांच्या सीआयए पथकाने चालवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, या टोळीतील चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक म्हणून सिकंदर शेखचं नाव समोर आलं आहे.या घटनेवर सिकंदरचे वडील, ज्येष्ठ पैलवान रशीद शेख यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या मुलाने स्वतःच्या कष्टाने नाव कमावलं आहे. कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात ओढलं आहे. मी आयुष्यभर हमाली करून कमावतो आहोत, माझ्या कुटुंबाने कधीही हरामच्या पैशाला हात लावला नाही. मग माझा मुलगा तसा मार्ग का धरावा? असा सवाल त्यांनी केला. रशीद शेख पुढे म्हणाले की, सिकंदरला देशभरातून मान-सन्मान मिळाला, त्याला गाड्या, घरं, सैन्यातील नोकरीसारख्या अनेक ऑफर्स आल्या. त्याला अवैध कृत्य करण्याची गरजच नव्हती. तो हिंद केसरी स्पर्धेसाठी तयारी करत होता. कदाचित त्याला स्पर्धेतून दूर ठेवण्यासाठी हा काही डाव असावा का, हेच आता कळत नाही.
सिकंदरच्या अटकेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि गंगावेश तालीममधील सहकारी कुस्तीपटूंमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेकांना विश्वास बसत नाही की मेहनती आणि शिस्तप्रिय पैलवान असा आरोपी ठरू शकतो. तालीममधील प्रशिक्षक आणि माजी खेळाडूंनी पोलिसांकडे सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. सिकंदर शेख हा कुस्तीच्या माध्यमातून गावागावातून तरुणांना प्रेरणा देणारा खेळाडू आहे. त्याने कधीच चुकीचा मार्ग धरला नाही. जर त्याच्यावर अन्याय होत असेल, तर सत्य लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी स्थानिक क्रीडा संघटनांकडून करण्यात आली आहे.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पपला गुर्जर गँगला अवैध शस्त्रं पुरवणाऱ्या रॅकेटचा तपास करत असताना सिकंदर शेखच्या संपर्कात काही आरोपी आले होते. प्राथमिक चौकशीत पोलिसांना त्याच्याविरोधात काही ठोस पुरावे मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून 5 पिस्तुलं, काही काडतुसे, 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम आणि स्कॉर्पिओ-एन तसेच एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी कोल्हापूरला जाऊन गंगावेश तालीम येथून सिकंदर शेखला अटक केली. एकेकाळी राष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या पैलवानावर अचानक आलेल्या या आरोपांमुळे क्रीडा क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

