मुंबई-खासदार संजय राऊत यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समोर आले आहे. संजय राऊत यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. संजय राऊत यांच्या तब्येतीत गंभीर बिघाड झाल्याने 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत याची माहिती दिल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी एका पोस्टद्वारे कामना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी कामना केली आहे. यावर संजय राऊत यांनी देखील उत्तर देत म्हटले, आदरणीय प्रधानमंत्री जी धन्यवाद! माझे कुटुंब आपले आभारी आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र! असे राऊतांनी ट्विट केले आहे.

मुलूखमैदानी तोफ खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. पण ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांशी संवाद साधतात. पण आज त्यांची पत्रकार परिषद झाली नाही. 15 दिवसांपूर्वीच त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आज त्यांची पत्रकार परिषद झाली नसल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी शंका उपस्थित केली होती. झालेही तसेच. संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्राद्वारे आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील किमान 2 महिने आपण सार्वजनीक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गट चिंतेत सापडला आहे.

संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले की, सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे 2020 मध्ये संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 स्टेन टाकण्यात आले होते. तत्पूर्वी, त्यांच्या हृदयात 2 ब्लॉकेज आढळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी अँजिओप्लास्टी केली होती. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या सल्लानुसार सातत्याने तपासणी करत आहेत. या स्थितीतही ते आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे जनतेपुढे मांडतात. या प्रकरणी मध्यंतरी त्यांच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली. पण ते मागे हटले नाही. उलट त्यांच्या टीकेची धार अधिकच वाढली. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामागेही संजय राऊतच असल्याची चर्चा आहे.
संजय राऊत हे शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून संजय राऊत ठाकरे गटाची बाजू अत्यंत दमदारपणे मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडून सत्ताधाऱ्यांना पळताभूई थोडी करण्याचे काम ते नित्यनियमाने करत असतात.
आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे सांगून एक नवा बॉम्बगोळा फोडला. यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील हा मुद्दा निकाली निघाला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.

