पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमनेसामने येणार आहेत. मात्र, शुक्रवारी रात्री मोठी घडामोड घडली. दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक होऊन यात अजित पवार आणि मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घ्यावे असा प्रस्ताव सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्याचे वृत्त आहे.
राज्यातील युतीच्या सत्तेत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे भागीदार आहेत. मात्र, कोणीही माघार घेतली नसल्याने या ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.यानंतर रात्रीतून घडामोडी घडल्या. आता अध्यक्षपदाबाबतचा निर्णय आज, शनिवारी होण्याची शक्यता आहे. मोहोळ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते मुंबईला रवाना झाल्याचे कळले. कदाचित अजित पवार आणि मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घेतील असे सांगण्यात येते .दरम्यान, धर्मादाय आयुक्तांनी २०१७ ते २०२१ आणि २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी सादर करण्यात आलेला बदल अहवाल फेटाळला आहे. यानंतरही ही निवडणूक घेतली जात आहे. त्यानंतर नेमके काय होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.खरं तर, याआधी ‘भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नव्या स्पोर्ट्स कोडनुसार तीन टर्म अध्यक्षपद भूषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमानुसार हे कृत्य बेकायदा ठरण्याची शक्यता आहे, असं मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भारतीय जनता पक्ष क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी मांडलं होतं. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचा मार्ग सुकर मानला जात होता.‘एमओए’चे विद्यमान सचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आर्थिक अपहार केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना या प्रकरणात शुक्रवारी जामीन मंजूर झाला. शिरगावकर यांच्यामुळे प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप, त्यांच्याच गटातील काहींनी केला आहे.

