पुणे :-शहरातील रस्ते खोदाई आणि खड्डे याबाबत येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने ३ नोव्हेंबरपासून खड्डेमुक्त रस्ते विशेष अभियान राबविणाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचा पथ विभाग आणि १५ क्षेत्रिय कार्यालयांची मिळून १५ टीम्सद्वारे हे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी येथे दिली.ते म्हणाले,’ सोमवार अर्थात ३ नोव्हेंबरपासून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी पथ विभाग आणि पंधरा क्षेत्रिय कार्यालयांच्या मिळून १५ टीम्स तयार करण्यात येणार आहेत. खड्डेमुक्त रस्ते अभियानासाठी रस्त्यांचे काम करणार्या ठेकेदारांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. महिन्याभरात विशेष मोहीम राबवून सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न राहातील.
शहरात मेट्रोचे काम, गृह विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनासाठी सुरू असलेल्या फायबर केबल टाकण्यासाठीच्या खोदाईमुळे आणि पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीतही भर पडत आहे. पावसाळा संपत आल्याने तसेच शहरात जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार असल्याने त्यापुर्वीच महापालिका प्रशासनाने शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत.
महापालिकेकडून शहरात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांना सशुल्क परवानगी दिली जाते. पथ विभागाकडून १ ऑक्टोबर ते ३१ एप्रिलपर्यंत खोदाईला परवानगी दिली जाते. त्यानंतर एक मे ला खोदाई बंद करून ३१ मे पर्यंत रस्ते दुरुस्त करणे बंधनकारक असते. तसेच पथ विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्ती केले जातात. मात्र, खोदाईनंतर दुरुस्तीची कामे योग्य प्रकारे केली जात नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. पावसाचे पाणी आणि खड्डे यामुळे वाहतुक मंदावते.
महापालिकेच्या विविध प्रकल्पांना, कामांना भेट देण्यासह आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरी प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. पाहणी दौऱ्याच्या दरम्यान त्यांना शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व अशास्त्रीय दुरुस्तीमुळे मोठी समस्या निर्माण झाल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शहरात खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान ३ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहे. यासाठी १५ पथके तयार करण्यात येणार आहे. या पथकांना प्रत्येकी १० – १० किलो मीटरची जबाबदारी दिली जाणार आहे. यासाठी ७ ठेकेदारांना काम दिले जाणार आहे. या कामात ठेकेदारांना एक रुपये सुध्दा फायदा होणार नाही, असेही आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

