पुणे, दि. 31 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातील सर्व इच्छुक व्यक्ती व संस्था ज्यांना एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिट स्थापन करायचे आहे, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
राज्यातील कृत्रिम वाळू धोरण जाहीर झाले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ही माहिती https://pune.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनासाठी उपलब्ध आहे.
एम-सॅण्ड युनिट स्थापनेसाठी इच्छुकांनी कागदपत्रांसह पूर्ण अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेत सादर करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत मिळकतीचा चालू ७/१२ उतारा, वैयक्तिक अर्जदारासाठी – आधारकार्ड व पॅनकार्ड, संस्थेच्या नावाने अर्ज असल्यास – संस्थेची कागदपत्रे, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र, अर्ज शुल्क रु. ५००/-, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या CTE परवान्याची प्रत, शंभर टक्के एम-सॅण्ड उत्पादनाबाबतचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र व दगडाच्या पुरवठा स्रोताचा तपशील जोडणे आवश्यक आहे.
यापूर्वी महाखनिज सॉफ्टवेअर प्रणालीवर एम-सॅण्डसाठी अर्ज केलेल्या युनिटधारकांनाही पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

