पुणे-एखाद्या वेबसीरिज किंवा चित्रपटाला शोभेल असे थरारनाट्य गुरूवारी मुंबईच्या पवई भागात घडले. रोहित आर्य नामक व्यक्तीने ऑडिशनच्या नावाखाली 17 लहान मुलांचे अपहरण केले. हे अपहरणनाट्य रोहितला यमसदनी पाठवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच संपुष्टात आले. त्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःहून पुढे येत आपण रोहित आर्यला आपल्या खिशातून पैसे दिल्याचा दावा केला. पण आता त्यांच्या याच दाव्यावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दीपक केसरकर यांनी रोहित आर्यला त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे, असे ते म्हणालेत.
विजय कुंभार शुक्रवारी आपल्या एका पोस्टद्वारे रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात दीपक केसरकर व आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दीपक केसरकर यांनी रोहित आर्यला त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे . कोणताही मंत्री कंत्राटदाराला अशा प्रकारे पैसे देणार नाही. त्यामुळे या कृतीमागील हेतू आणि प्रशासनाची, विशेषतः आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. केसरकरांनी स्वतः चेकद्वारे मदत केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या व्यवहाराचा सखोल तपास आवश्यक आहे कारण सामान्य व्यवहारात अशी वैयक्तिक मदत संशयास्पद ठरते, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. शासनाकडं थकीत असलेल्या बिलासाठी रोहित आर्याने मुलांना ओलीस धरण्याचं अघोरी आणि गुन्हेगारी कृत्य केलं यात काही शंका नाही, पण त्याच्या थकीत बिलाच्या विषयाकडं मात्र दुर्लक्ष करता येणार नाही. ठेकेदारांची तब्बल ८० हजार कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत.
बिलं मिळत नसल्याने यापूर्वी नागपूर तसंच सांगली येथील तरुण ठेकेदाराने आत्महत्या केली आहे. तरीही सरकारला याचं गांभीर्य कळत नाही. थकीत बिलांची मागणी करणाऱ्या ठेकेदारांनी चुकीचं पाऊल उचलावं आणि यात त्याचा एन्काऊंटर करावा किंवा त्याने स्वतःहून तरी आत्महत्या करावी, याची तर सरकार वाट बघत नाही ना? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अन्य एक नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी सरकारला काही प्रश्न विचारलेत. कंत्राटदारांना आपले पैसे मिळवण्यासाठी आता अपहरण करावे लागत आहे. ही पोस्ट CMO महाराष्ट्र ची आहे. यात काल एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्य याचा उल्लेख आहे. रोहित आर्यचे सरकारकडे काही कोटी रुपये थकीत होते. ते मिळत नसल्याने त्याने लहान मुलांचे अपहरण करण्याचा कट रचला. अर्थात याच समर्थन मी मुळीच करणार नाही, पण आर्यवर ही वेळ का आली..? याच उत्तर सरकार देणार आहे का..? असे ते म्हणालेत.

