रोहित आर्यवर ‘ती’हि’ परिस्थिती सरकारनेच आणली. हा प्रसंग टाळता आला असता.
मुंबई-आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचे मुंबई पोलिसांनी केलेले एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी केला आहे. पोलिसांना रोहित आर्य यांच्या हात किंवा पायावर गोळी मारता आली असती. पण डीसीपी अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचे असल्यामुळे त्यांनी थेट त्याच्या छातीत गोळी घालून त्याला यमसदनी पाठवले, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईतील ‘रा’ स्टुडिओत गुरूवारी घडलेल्या अपहरणनाट्यामुळे अवघा देश हादरला. पोलिसांनी अपहरकर्त्या रोहित आर्य नामक व्यक्तीला गोळ्या घालून ठार केले. पण आता या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी या प्रकरणी पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हायकोर्टात दाद मागण्याचे संकेत दिलेत. रोहित आर्य याला गोळी घालून ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का? असा प्रश्न त्यांनी या संबंधी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, बचाव मोहीम सुरू असताना रोहित आर्य डीसीपी दत्ता नलावडे यांच्याशी संवाद साधत होता. पोलिसांना रोहित आर्य याची प्राश्वभूमी माहिती झाल्यानंतर त्यांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क का साधला नाही? तो दीपक केसरकर यांच्या संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांनी केसरकरांना त्याच्याशी का बोलू दिले नाही? मुंबई पोलिसांनी या प्रकरणी टोकाचे पाऊल का उचलले? रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवले, पण त्याच्यावर ती परिस्थिती सरकारनेच आणली. हा प्रसंग टाळता आला असता.
रोहित आर्य अतिरेकी नव्हता. सरकारची कामे करत होता. त्याने त्याच्या सरकारी कामाचे पैसे मिळवण्यासाठी उपोषणही केले होते. पण सरकारने त्याला ते पैसे दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर असे कृत्य करण्याची वेळ आली. सरकारने त्याला का वाचवले नाही?
नितीन सातपुते पुढे म्हणाले, रोहित आर्यकडे पिस्तुल होते की नाही हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही. डीसीपी दत्ता नलावडे यांनी या प्रकरणी तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच्याकडे छऱ्यांची बंदूक होती. त्या बंदुकीने कुणाचीही हत्या करता येत नाही. पोलिसांना रोहित आर्यच्या हात किंवा पायावर गोळी मारता आली असती. पोलिस म्हणतात, आम्ही पायावरच गोळी मारली. पण पायातून काहीतरी काढायला तो खाली वाकला आणि गोळी छातीत घुसली. पोलिसांचे हे स्पष्टीकरण खोटे असल्याचे एखादा लहान मुलगाही सांगेल.
एपीआय अमोल वाघमारे या अधिकाऱ्याला हिरो व्हायचे होते. त्यामुळे त्याने हे एन्काऊंटर केले. पोलिसांनी मुलांची सुटका केली ही कौतुकाची गोष्ट आहे, पण ज्याला एन्काऊंटरमध्ये मारले तो सराईत गुन्हेगार नव्हता. त्याचा फेक एन्काऊंटरमध्ये खून करण्यात आला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही नितीन सातपुते यांनी यावेळी सांगितले.

