पुणे, दि. २९:
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामपंचायत रासे येथे भूमिहीन व बेघर कुटुंबांसाठी उभारण्यात येणाऱ्या ५२ घरकुलांच्या गृहसंकुलाचे भूमिपूजन गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते Habitat for Humanity India Trust (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आज मोठ्या उत्साहात पार पडले.
जिल्हा परिषद पुणे मार्फत या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांची मंजुरी देण्यात आली होती. लाभार्थ्यांना गायरान शासकीय जागेचे विनामूल्य वाटप करून जून २०१९ मध्ये ऑनलाइन मंजुरी देण्यात आली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये पहिल्या हप्त्याचे अनुदानही वितरित करण्यात आले होते. तथापि, स्थानिक पातळीवरील काही अडचणींमुळे बांधकाम सुरू होऊ शकले नव्हते. ग्रामपंचायत रासे, पंचायत समिती खेड आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पुणे यांच्या पाठपुराव्यामुळे Habitat for Humanity India Trust संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या गृहसंकुलामध्ये प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, वीज (सौरऊर्जा संच), स्वच्छता सुविधा, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या सर्व मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संस्था शासनाच्या निकषांनुसार आधुनिक व टिकाऊ बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून घरे उभारणार आहे. या उपक्रमामुळे ठाकर समाजासह वंचित व गरजू कुटुंबांना पक्क्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे.
या कार्यक्रमास श्रीमती शालिनी कडू, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा; भूषण जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत); विशाल शिदे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती खेड; तसेच Habitat for Humanity India Trust संस्थेचे वरिष्ठ अधिकारी राजीव रमण, बुरहानुद्दीन बोहरा, सतीश जाधव आणि ग्रामपंचायत रासेचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे शासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून ग्रामीण भागात टिकाऊ व सशक्त विकासाचा पाया रचला जात असून, जिल्हा परिषदेच्यावतीने हे पुणे जिल्ह्यातील पहिलेच सामूहिक घरकुल गृहसंकुल ठरणार आहे.

