पुणे-
ताम्हिणी घाट परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे डोंगरकड्यावरून छोटे-मोठे दगड कोसळत आहेत. याच दरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून माणगावकडे जाणाऱ्या कारवर डोंगरावरून कोसळलेला दगड थेट कारच्या सनरूफमधून आत घुसला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती असे असून, त्यांचे पती आणि मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.
आज सकाळी स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासह पुणे-रायगड जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून प्रवास करत होत्या. घाटात सतत जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगरावरून सतत दगड कोसळत होते. अचानक एक मोठा दगड त्यांच्या कारच्या टपावर आदळला आणि सनरूफची काच फोडून आतमध्ये घुसला. दगड थेट स्नेहल गुजराती यांच्या डोक्यात लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पती आणि मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. स्नेहल यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अवकाळी पावसामुळे ताम्हिणी घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूस्खलन आणि दगड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटातून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रशासनाने रस्त्यांची पाहणी आणि सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे आदेश दिले आहेत
या घटनेनंतर पुन्हा एकदा सनरूफच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतात कार विक्रीसाठी सनरूफ हे एक आकर्षक फीचर म्हणून दाखवले जाते, मात्र ते प्रत्यक्षात सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. परदेशात थंड वातावरणामुळे सूर्यकिरणे अंगावर घेण्यासाठी सनरूफचा वापर केला जातो, परंतु भारतात तो बहुतेकदा बाहेर डोकावण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे अपघाताच्या वेळी काच फुटून जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडतात.

